फोटो पी १५ नांदगाव
नांदगाव खंडेश्वर : शहरात अग्निशमन वाहन व पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक एक्स्प्रेस फीडरकरिता माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अन्य कुणी त्याचे श्रेय घेण्याची धडपड करू नये, असा दावा माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी केला आहे.
पत्रपरिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे, माजी सभापती फिरोज खान, गजानन मारोटकर, सीमा जाधव व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निशिकांत जाधव उपस्थित होते. काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांच्या कालखंडात चौदाव्या वित्त आयोगाचे तीन कोटी रुपये शिल्लक होते. त्यावेळी त्यातून कचरा डेपोची निर्मितीसाठी चार स्थळांची पाहणी करण्यात आली होती. पण, त्या जागांवर नागरिकांनी हरकती घेतल्याने तो निधी शिल्लक राहिला. त्या निधीमधून व जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नांदगाव क्षेत्रासाठी अग्निशमन वाहन खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचित केले. तसेच एक्स्प्रेस फीडरच्या कामात विद्यमान आमदार अडसड यांचा संबंध नसल्याचेही काँग्रेसच्या मंडळीने यावेळी सांगितले.
पालकमंत्रिपदी यशोमती ठाकूर विराजमान झाल्यावर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नाने अग्निशमन वाहन व पाणीपुरवठा यंत्रणेसाठी एक्स्प्रेस फीडर ही कामे मार्गी लागली. कोरोनामुळे त्या कामास सध्या विलंब होत असल्याचेही काँग्रेसच्या मंडळीने सांगितले. भाजपचे माजी नगराध्यक्ष संजय पोफळे यांनी निकटवर्तीय ठेकेदारांची बिले काढण्यासाठी काही तासांसाठी केलेले उपोषण ही एक नौटंकी होती, असा आरोपही करण्यात आला.