अमरावती शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा ! आठ वर्षांपूर्वीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:07 AM2024-11-28T11:07:43+5:302024-11-28T11:08:41+5:30
Amravati : रुग्णालयांना मागविला पुरवठ्याचा तपशील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय रुग्णालयात अन्नधान्य पुरवठ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आठ वर्षांपूर्वी झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी २२ नोव्हेंबरला अकोला मंडळात येणाऱ्या अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला व यवतमाळ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांना आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयाने अन्नधान्य पुरवठ्याचा तपशील, तसेच रुग्णालयांची नावे पत्ता तेथील संबंधित अधिकाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये अन्नधान्य पुरवठ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार २० फेब्रुवारी २०१६ रोजी तत्कालीन आमदार स्व. सरदार तारासिंह यांनी केली होती. यामध्ये पुरवठादारांनी कक्ष अधिकारी ते प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी संगनमत करून कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर संबंधित गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत पुरवठादारांची थकीत बिलेदेखील थांबविण्यात आली होती. या प्रकरणातील पुढील चौकशीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग मुंबई अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाला १९ नोव्हेंबर २०२४ रोजी माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आयुक्तालयाने अकोला मंडळातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा शल्यचिकित्सक यांना २२ नोव्हेंबरला अन्नधान्य गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सर्व रुग्णालयांचा तपशील मागविला आहे.
गीताई महिला बचत गटाकडून झाला होता पुरवठा
अकोला मंडळांतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना चांदूर बाजार येथील गीताई महिला बचत गट औद्योगिक सहकारी संस्थेकडून अन्नधान्य, तसेच इतर वस्तू पुरवठा करण्यात आला आहे. या संस्थेकडून पुरवठा झालेल्या सर्वच रुग्णालयांचा तपशील मागविण्यात आला आहे.
"२०१६ या वर्षामध्ये झालेल्या अन्नधान्य पुरवठ्यातील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने रुग्णालयांचा तपशील मागविण्यात आला आहे. हा तपशील गोळा करणे सुरू आहे. यासंदर्भातील माहिती सर्व रुग्णालयांना मागविली आहे. हा तपशील प्राप्त होताच पाठविण्यात येईल."
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक