मेळघाटात टेम्बली गावात वनविभागाची ड्रोनने शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:00 AM2021-11-26T05:00:00+5:302021-11-26T05:01:04+5:30
धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. ड्रोननेसुद्धा शोधमोहीम चालवली असून दिसताच ट्रँक्यूलाईझ करणारी टीम तयार असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना होत आहेत.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : धारणी तालुक्यातील टेम्बली गावात पुन्हा एक लांडगा गावशिवारावर आढळून आल्याची माहिती मिळताच मंगळवारी वनविभाग, व्याघ्र प्रकल्पाच्या चमूसह विशेष टीमने ठिय्या दिला आहे. ड्रोन कॅमेऱ्याने वनकर्मचाऱ्यांनी शोध मोहीम चालविली आहे. परंतु, अद्याप काहीच आढळून आलेले नाही. तथापि, गावागावात दवंडी पिटून मुले व वयोवृद्धांना घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक गिन्नी सिंग, उपवनसंरक्षक विनोद डेहनकर, सहायक वनसंरक्षक विद्या वसव व इंद्रजित निकम घटनाक्रमाचा आढावा घेत आहेत. आरएफओ शुभांगी डेहनकर, पुष्पा सातारकर व राजेश महल्ले, आरआरटी, आरआरयू टीम, धारणी, सुसर्दा, धूळघाट, ढाकणा येथील वनपाल व वनकर्मचारी चार दिवसांपासून दिवस-रात्र जंगलासह गावपरिसरात तळ ठोकून आहेत.
सर्व पाच टीम गावात सज्ज आहेत. ड्रोननेसुद्धा शोधमोहीम चालवली असून दिसताच ट्रँक्यूलाईझ करणारी टीम तयार असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना होत आहेत.
कोरकू भाषेतून मुनादी
जंगलाकडे जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अशी मुनादी कोरकू भाषेतून दिली जात आहे. लहान मुले व वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला वनविभागाने दिला आहे.
टेंबली गावाच्या परिसरात मंगळवारी एक लांडगा दिसल्याची माहिती मिळताच सर्व टीमने दिवसभर तेथे शोधमोहीम राबविली. ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. मुले व वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.
- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा, ता. धारणी