: सीसीटीव्ही फुटेज तपासलेत
परतवाडा : अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याने परतवाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे यांनी या चौकशीच्या अनुषंगाने मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वन विभाग अमरावती यांचे कार्यालयात कार्यरत लिपिकाला ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात बोलाविले. तब्बल दीड तास त्या लिपिकाची त्यांनी कसून चौकशी केली.
तक्रारीत या लिपिकाचे नाव नमूद असून त्यावर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीत नाव असलेल्या वनरक्षकाला व वनमजुरासह त्या लाकूड व्यापाऱ्यालाही पोलिसांनी चौकशीकरिता बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे. पण, काही कारणास्तव ते शनिवारी पोलीस ठाण्यात हजर होऊ शकले नाहीत. या सर्वांची चौकशी परतवाडा पोलीस करणार आहेत.
दरम्यान पोलिसांनी व वनविभागाने
परतवाडा ते धारणी रोडवरील गौरखेडा गावालगतच्या त्या ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजही बघितले. त्या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयात घातलेला गोंधळही कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद असल्याची वनविभागाच्या सूत्रांची माहिती आहे.
या महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालयात ४ मे रोजी चांगलाच गोंधळ घातला. यात त्या महिला कर्मचाऱ्याची आक्रमकता बघून वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा यांनी तिला वैद्यकीय तपासणी करण्या करिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. दरम्यान संतुलन हरवलेल्या या महिला कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उगारला. यामुळे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले. यात अचलपूर पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घडामोडीनंतर त्या निलंबित महिला कर्मचाऱ्याने परतवाडा पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.