अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना
चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. ही घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील घडली.
गुरूवारी दुपारी १२.३० वाजतापासून चांदूर रेल्वे शहरासह ग्रामिण भागात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी - नाल्यांतील पाणी दुपारी तुडूंब वाहत होते. अशातच चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या पळसखेड मार्गावरील रेल्वे पुलाखाली व समोरील नाल्याच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अमरावती मधील चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोकं टवेरा गाडी क्र. एमएच २६ व्ही २२८५ ने अमरावती वरून वर्धा कडे चांदूर रेल्वे मार्गे जात होते. अशातच ते पळसखेड मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज खालून वर्धा बायपास कडे गेले होते. मात्र समोरील रस्ता बंद असल्यामुळे ते परत त्याच मार्गाने रेल्वे अंडरब्रिज कडे परत येत असतांना ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनी जवळील नाल्यामधील आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे नाल्याचा अंदाज न आल्याने टवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी पाण्यात डूबत असल्याचे लक्षात येताच पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व इतर काही मजुर धावून आले व त्यांनी गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा सर्व ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले व सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यानंतर पाण्यात अडकलेली गाडी सुरूवातीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीने गाडी न निघाल्याने क्रेन बोलाविण्यात आली. पाणी उतरल्यानंतर क्रेन च्या सहाय्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गाडी बाहेर काढण्यात आली.
‘ते’ ठरले देवदूत
जीवाची पर्वा न करता अडकलेल्या गाडीतील ६ लोकांचा जीव पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व मजुर यांनी वाचविला. ते वेळेवर पोहचल्याने सर्वांचा जीव वाचला त्यामुळे‘ते’ देवदूत ठरले आहे.