वरूड : तालुक्यात कोरोना संक्रमितांसह त्यांच्या मृत्यूचा टक्कादेखील वाढताच आहे. त्याअनुषंगाने येथील ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी कोविड केंद्रात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास नगर परिषदेच्यावतीने मोफत कामगार आणि लाकडे देऊन अंत्यसंस्काराची सुविधा दिली जात आहे.
मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्यावतीने ही सुविधा अविरत सुरू केली आहे. कोणत्याही मोठ्या शहरात कोविड रुग्ण दगावला तर महानगर पालिकेच्यावतीने मोक्षधामात पोहोचविल्या जाते. मात्र तेथे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाची किंमत नातेवाइकांना मोजावी लागते. परंतु वरूड नगर परिषद त्याला अपवाद ठरली असून ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी कोविड रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह नेणारे कामगारांचे पथक आणि दाह संस्कारासाठी लाकडे मोफत देण्याचे सामाजिक कार्य वरूड नगर परिषदेकडून अविरत केले जात आहे.