प्रचाराकरिता महापालिका कर्मचाऱ्याला ‘फ्री हॅन्ड’
By admin | Published: February 8, 2017 12:08 AM2017-02-08T00:08:14+5:302017-02-08T00:08:14+5:30
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आप्ताच्या प्रचाराकरिता महापालिका कर्मचाऱ्याला विनाप्रमाणपत्र वैद्यकीय रजा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे.
वरदहस्त कुणाचा? : शनिवारी बदली, सोमवारी रजा
अमरावती : निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आप्ताच्या प्रचाराकरिता महापालिका कर्मचाऱ्याला विनाप्रमाणपत्र वैद्यकीय रजा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. एकीकडे निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे संबोधत अन्य कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर करायच्या आणि दुसरीकडे मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठी नियम धाब्यावर बसवायचे, हा सापत्न प्रकार सोमवारी महापालिकेत उघड झाला. निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली बदली व पाठोपाठ तिसऱ्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर झाल्याने प्रशासकीय लालफितशाही उघड झाली आहे.
करवसुलीत अन्य झोनच्या तुलनेत ‘ढांग’ असलेल्या मध्य झोन क्र. २ मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून करवसुलीची जबाबदारी असलेल्या एका कर्मचाऱ्याची ४ फेब्रुवारी रोजी आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशाने सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली. आदेश प्राप्त होताच संबंधितांना बदली झालेल्या विभागात ुरूजू होऊन तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा, त्याचप्रमाणे विभागप्रमुखांनी त्या कर्मचाऱ्याला तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशही पवारांनी काढलेत. येथपर्यंत ही मोहीम यशस्वी करण्यात आली. झोन २ ची मालमत्ता करवसुली समाधानकारक नसल्याने व ३१ मार्च तोंडावर आली आहे.
वेगळा न्याय का ?
अमरावती : त्यामुळे वसुली लिपिकाची बदली करणे योग्य नसल्याचा सूर कर्मचाऱ्यांमध्ये आहे. मात्र हा कर्मचारी तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने ६ फेब्रुवारीला सामान्य प्रशासन विभागात रुजू न होता झोन २ च्या सहायक आयुक्तांकडून नोटशीट चालवून आपण ६ फेब्रुवारीपासूनच वैद्यकीय रजेवर जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाला कळविले. मात्र, त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा अनारोग्याबाबत कुठलाही ठोस पुरावा दिला नाही. डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय वैद्यकीय रजेवर जाता येत असेल तर यापूर्वीच्या जीएडी अधीक्षकांची वैद्यकीय रजेचा अर्ज का फेटाळण्यात आला याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाने देणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे झोन २ मधून बदली झाल्यानंतर या कर्मचाऱ्याने तातडीने सामान्य प्रशासन विभागात रुजू होऊन कार्यभार स्वीकारणे अनिवार्य होते. मात्र तसे न करता वैद्यकीय रजेची पळवाट शोधण्यात आली. त्यामुळे या कर्मचाऱ्याला नेमका कुठल्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे याबाबत महापालिकेत चर्चा झडत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदली वा रजेबाबत सापत्न वागणूक देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांचा लक्षवेध
निवडणूक काळात अर्धेअधिक कर्मचारी-अधिकारी राबत असताना ‘मर्जीतील’ कर्मचाऱ्यांच्या ‘सेफ’ बदलीसाठी शब्द टाकला जातो. कर वसुली अग्रक्रमाने करण्याच्या काळात बदलीही केली जाते आणि कामकाजाच्या पहिल्या दिवशी नाममात्र अर्ज टाकून तो कर्मचारी रजेवर निघुनही जातो. यासंपूर्ण प्रकाराबाबत आयुक्त अनभिज्ञ असतील तर त्यांनी ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या या ‘सेफ गेम’कडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
प्रचारासाठी मुक्त
सूत्रानुसार, झोन २ मधून जीएडीत बदली झालेल्या याकर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एक महिला सदस्य अंबापेठ प्रभागातून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वेळ मिळावा आणि नियोजनासाठी याकर्मचाऱ्याने पहिल्यांदाच बदली व नंतर जीएडीत न जाता वैद्यकीय रजेचा ‘सेफगेम’ खेळला.