मनातील भीती काढा, आनंदासाठी काम करा- नंदकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 05:57 PM2017-12-13T17:57:18+5:302017-12-13T17:57:30+5:30
अमरावती : एवढ्या सभा, कार्यशाळा झाल्यात; पण आज कुठून सुरुवात करायची, कळत नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमागील दुहेरी उद्देश मला माहीत आहे.
अमरावती : एवढ्या सभा, कार्यशाळा झाल्यात; पण आज कुठून सुरुवात करायची, कळत नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमागील दुहेरी उद्देश मला माहीत आहे. तेव्हा मनातील भीती काढा व आनंदासाठी काम करा, असा संदेश शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विषय साधन व्यक्तींच्या राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेत दिला.
विषय साधन व्यक्ती प्रदेश महासंघातर्फे विषयसाधन व्यक्ती यांच्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शासकीय विदर्भ महाविद्यालयातील संगीतसूर्य केशव भोसले सभागृहात करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या १० वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात करार पद्धतीने काम करणा-या विषयसाधन व्यक्तींना शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, हा आयोजनामागील उद्देश होता. नंदकुमार पुढे म्हणाले की, आज न उद्या नोकरीचा प्रश्न मार्गी निघेलच; पण आज ज्या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी आपण काम करीत आहोत, त्यांचे भविष्य खराब होऊ नये, याची जबाबदारी आपण घेऊ या. शिक्षण क्षेत्रातील सर्वात तरुण वयोगट म्हणून मी तुमच्याकडे पाहत आहे. सर्व मरगळ झटकून कामाला लागा. मूल का शिकत नाही, याचा शोध घ्या. स्वत:चे अस्तित्व निर्माण करा, असा सल्ला नंदकुमार यांनी दिला.
विचारमंचावर विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, उपसंचालक सी.आर. राठोड, जिल्हा परिषदेचे सीईओ किरण कुलकर्णी, शिक्षण सल्लागार सिद्धेश वाडकर, डीआयसीपीडी अमरावतीचे प्राचार्य रवींद्र आंबेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.बी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके, श्याम मक्रमपुरे, जितेंद्र राठी, रत्नमाला खडके उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातील दोन हजारांवर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश आंबेकर, संचालन विषयसाधन व्यक्ती राजेश नाईक व गायकवाड, तर आभार प्रदर्शन विवेक राऊत व संघटनेचे राज्यध्यक्ष परमेश्वर काकडे यांनी केले.