नवाथे येथील ‘मल्टिप्लेक्स’च्या ‘पीएमसी’ निविदेवरून घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:36+5:302021-06-26T04:10:36+5:30
भाजप-काँग्रेस आमने-सामने, विरोधी पक्षनेत्यांचे निविदा रद्द करण्याचे आयुक्तांना पत्र अमरावती : बडनेरा मार्गालगतच्या नवाथे येथे महापालिका नियंत्रणात ‘मल्टिप्लेक्स’ साकारण्यासाठी ...
भाजप-काँग्रेस आमने-सामने, विरोधी पक्षनेत्यांचे निविदा रद्द करण्याचे आयुक्तांना पत्र
अमरावती : बडनेरा मार्गालगतच्या नवाथे येथे महापालिका नियंत्रणात ‘मल्टिप्लेक्स’ साकारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्तीसाठी निविदा प्रक्रियेवरून महापालिकेत घमासान सुरू झाले आहे. विकासकामांचा पत्ता नाही; पण आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या विषयावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने उभे ठाकल्याने यात राजकारण तर नाही ना, असा सूर उमटू लागला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांना ‘मल्टिप्लेक्स’च्या ‘पीएमसी’
नियुक्तीच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबतचे पत्र दिले आहे. महापौर चेतन गावंडे, स्थायी समिती सभापती
सचिन रासने, पक्षनेता तुषार भारतीय आदी सत्तारूढ भाजप नेत्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. ‘मल्टिप्लेक्स’च्या ‘पीएमसी’च्या नियुक्तीचा ठराव ९ ऑगस्ट २०१९ रोजी स्थायी समितीत घेण्यात आला. आता या प्रक्रियेला नव्याने वेग देण्याचे काम करण्यात येत असल्याचा दावा स्थायी समिती सभापती रासने यांचे म्हणणे आहे. याच विषयावरून १८ जून रोजी महापालिका सर्वसाधारण सभेत ‘मल्टिप्लेक्स’च्या ‘पीएमसी’ निविदेवरून सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र, हा विषय २०१९ मध्ये स्थायी समितीत मंजूर झाला असताना आताच या विषयावर जाग कशासाठी आली, असा सवाल सत्तारूढ भाजपने केला आहे. नवाथे ‘मल्टिप्लेक्स’वरून महापालिकेत श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
--------------------
‘मल्टिप्लेक्स’ची नव्हे तर ‘पीएमसी’साठी निविदा
तत्कालीन स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार यांच्या कार्यकाळात ९ ऑगस्ट २०१९ रोजी विषय क्रमांक ४९ नुसार नवाथे येथील ‘मल्टिप्लेक्स’च्या ‘पीएमसी’ नियुक्तीसाठी निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. काही कारणास्तव या प्रकल्पाला विलंब झाला. आता त्याच प्रक्रियेला पुढे निरंतर प्रवास करण्यासाठी मार्गी लावण्यात येत आहे. सध्या ‘मल्टिप्लेक्स’ निर्मितीचा प्रश्नच नाही. केवळ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
---------------------
पीएमसी म्हणजे काय?
एखादा मोठा प्रकल्प तयार करताना बाहेरील एजन्सी नेमून त्या माध्यमातून प्रारूप आराखडा तयार करण्यात येतो. नेमके हीच बाब महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. आता केवळ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त केले जाणार आहे. ही जागा महापालिकेने दीड कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याकरिता ही दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती स्थायी समिती सभापती सचिन रासने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
--------------------
आमसभेत चर्चेला येण्यापूर्वीच ‘मल्टिप्लेक्स’साठी एजन्सी नियुक्तीकरिता निविदा काढणे हा भाजपचा डाव आहे. मर्जीतील कंत्राटदाराला ही कामे मिळावीत, यासाठी त्यांचा खटाटाेप आहे. आयुक्तांना पत्र देऊन ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली आहे.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता.
----------
‘मल्टिप्लेक्स’प्रकरणी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या गाइडलाइननुसार महापालिका काम करीत आहे. कायद्याची चौकट आणि उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प पूर्ण होणे काळाची गरज आहे. यात कोणतीही नियमबाह्य कामे नाहीत. केवळ ‘पीएमसी’ नियुक्ती होणार आहे.
-तुषार भारतीय, पक्षनेता, महापालिका