अमरावती : लॉकडाऊनमध्ये देशभरातील रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोना संसर्ग ओसरू लागल्याने हळूहळू रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. सोमवार, १४ डिसेंबरपासून हावडा- मुंबई गितांजली स्पेशल एक्स्प्रेस सुरू होत आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३२ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. मात्र, अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेस सुरू होण्यास अद्यापही प्रतीक्षा आहे.
हावडा-मुंबई, हावडा- अहमदाबाद, नागपूर- पुणे, हावडा-मुंबई मार्गावरील काही रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. आता रेल्वे प्रशासनाने हावडा- मुंबई गितांजली स्पेशल एक्स्प्रेस (०२२६०) ही गाडी १४ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसटी येथे १५ डिसेंबर रोजी रात्री पोहचणार आहे. परतीला मुंबई- हावडा गितांजली स्पेशल एक्स्प्रेस (०२२५९) ही १६ डिसेंबर रोजी मुंबई येथून हावडाकडे रवाना होईल. बडनेरा रेल्वे स्थानकावर १६ डिसेंबर रोजी दुपारी ४.१२ वाजता पोहचणार आहे. गितांजली एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. एकूण २२ डब्यांची ही गितांजली असून, आरक्षणाशिवाय गाडीत प्रवेश नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
--------------------
सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या अंबा एक्स्प्रेसकडे दर्लक्ष
अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेस सुरू झाल्याच्या दिवसांपासून निरंतरपणे हाऊसफुल्ल धावली. भुसावळ रेल्वे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारी अंबा एक्स्प्रेसची ओळख आहे. मात्र. अन्य रेल्वे गाड्या सुरु करत असताना मुंबई मार्गे ही गाडी का सुरू केली जात नाही, हा संशाेधनाचा विषय आहे. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरली असताना अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेस सुरू न करणे ही बाब आश्चर्रकारक मानले जात आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लक्ष देऊन अंबा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.