अमरावती : राज्यात उद्योगाचे जाळे निर्माण करून ह्य मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना साकारण्यासाठी उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तसेच वंचित घटकांसह शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. येथील नेहरू स्टेडियमवर ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच पोलीस बॅन्ड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर करण्यात आले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू पालकमंत्र्यांसमवेत ध्वजस्तंभा जवळ होते. पालकमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणाले, राज्य शासन लोकाभिमुख आहे. अमरावती जिल्ह्याला संतांचा वारसा असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वक्षेत्रात निश्चितपणे विकास होईल. दुष्काळ, पाणीटंचाईची झळ पोहचू नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला अधिक गतिमान करण्यासाठी योग्य नियोजन व प्रयत्न करण्यात येत आहेत. हा जिल्हा संत्रा उत्पादक जिल्हा आहे. या संत्रा उत्पादकांच्या उन्नतीसाठी वरूड- मोर्शी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचे नियोजित आहे. उद्योगांना परवडेल अशी कमी दरात वीज उपलब्ध करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. अमरावती शहराच्या बाबतीत बोलतांना पालकमंत्री पोटे म्हणाले अमरावती शहर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अधिक सुंदर करण्यासाठी विकास आराखडा तयार केला जात आहे. तसेच येथील विमानतळाचा कायापालट व नाईट लॅन्डींगची सुविधा निर्माण करण्यासाठी सुध्दा प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना २४ तास आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थितांसह जिल्ह्यातील नागरीकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राज्य राखीव पोलीस दल, शहर पोलीस, गृह रक्षक दल, महिला गृह रक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना (मुले- मुली) , शहर वाहतूक , स्काऊट गाईड, नवोदय विद्यालय, श्वान पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस रुग्ण वाहिका, मनपाचे अग्निशमन दल, सामाजिक वनीकरण, जलयुक्त शिवार अभियान, पोलीस बॅन्ड पथकाने पथसंचलनाद्वारे पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. सुरूवातीस या समारंभात राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस आयुक्त सुरेश मेकला, राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस निरीक्षक गौतम गाडेमोडे यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. जिल्ह्यात म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठया प्रमाणावर कामे सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी किरण गीत्ते, उपजिल्हाधिकारी बावणे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संत तुकाराम वनग्राम योजनेत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती पायविहीर (अचलपूर) केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती राणीगांव ( धारणी), केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती कारला, २०११-१२ व २०१२-१३ चा पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जिल्हास्तर पुरस्कार शहनाज परवीन सिद्दीकी, कल्पना विघे यांना देण्यात आला.
‘मेक इन महाराष्ट्र’साठी शासन कटिबध्द
By admin | Published: January 27, 2015 11:26 PM