गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले
By गणेश वासनिक | Published: December 29, 2022 02:22 PM2022-12-29T14:22:49+5:302022-12-29T14:23:47+5:30
गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार कसा होणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आदिवासींचे साकडे
अमरावती : गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार व संवर्धन झाले पाहिजे म्हणून गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय २००२ मध्ये नागपूर येथे मंजूर झाले. परंतु २० वर्षे होऊनही काम रखडलेले आहे. मात्र आता गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्रायबल फोरमने केली आहे.
पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उपकेंद्राला गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे. विदर्भात गोंडीयन समाज मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासामध्ये गोंडीयन संस्कृती व गोंड राजांना अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष म्हणजे नागपूर नगरी गोंडराजे बख्तबुलंदशहा यांनी बसवली आहे. आदिवासी समाजाचे जीवन, कला, भाषा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यात २१ कोटी रुपये मंजूर केले आहे. पैसा येऊन एक दशक उलटून गेले तरी गोंडवाना संग्रहालयाच्या कामाला गती मिळाली नाही.
जागा आणि निधी उपलब्ध
गोंडवाना संग्रहालयासाठी केंद्र सरकारने सन २०१४ मध्ये १० कोटी व २०१५ मध्ये ११ कोटी असे एकूण २१ कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यातून बांधकामाचा खर्च करण्यात येणार होता. जागेअभावी संग्रहालयाचे काम रखडलेले होते. मात्र २०१९ मध्ये सुराबर्डी येथील १२ एकर जागा संग्रहालयाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. जागा व पैसा उपलब्ध असूनही संग्रहालयाचे घोंगडे भिजतच आहे.
गोंडी संस्कृतीचे संवर्धन व्हावे
बोलीभाषा, पारंपारिक पोशाख, दागदागिने, देवदेवता,साहित्य, जीवनकला, संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे. लवकरात लवकर गोंडवाना संग्रहालयाचे काम व्हावे. याकरिता राज्य सरकारला शिष्टमंडळाने भेट देवून निवेदन दिले आहे.
- अँड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र