शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उभारणार ‘मिनी टेक्सटाईल लॅब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:39+5:302021-01-20T04:14:39+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रदर्शनाची पाहणी, गृहशास्त्र, टेक्सटाईल विभागाला भेट अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) ची आता ‘ऑटोनॉमस’कडे ...
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रदर्शनाची पाहणी, गृहशास्त्र, टेक्सटाईल विभागाला भेट
अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) ची आता ‘ऑटोनॉमस’कडे वाटचाल सुरू झाली आहे. उच्च शिक्षणासाठी ही संस्था महत्त्वाची ठरणारी असून, येत्या काळात ‘व्हीएमव्ही’त मिनी टेक्सटाईल लॅब उभारून या क्षेत्रात भरीव कामगिरी केली जाईल. त्याकरिता शासनाकडे सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे दिली.
व्हीएमव्हीच्या गृहशास्त्र आणि टेक्सटाईल विभागाला भेट देऊन, टेक्सटाईलच्या प्रदर्शनाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. याप्रसंगी ते म्हणाले, या संस्थेत शिक्षणासह उद्योग, रोजगाराची निर्मितीचे वातावरण आहे. पदव्युत्तर टेक्सटाईल विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्यामुळे भरीव कामगिरी करण्यासाठी येथे ‘मिनी टेक्सटाईल लॅब’ उभारणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता मी स्वत: पुढाकार घेणार असून, लॅब निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. रोजगार निर्मिती, ईको टुरिझममध्ये वाढ करण्यासाठी व्हीएमव्हीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे संचालक वसंत हेलावी रेड्डी, गृहशास्त्र विभागप्रमुख अंजली देशमुख, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक यू.एस. पुरी, राज्यमंत्र्यांचे ओएसडी तुषार लांडगे, सुनील सोसे, आयटीआयचे उपप्राचार्य पी.जी. कुमरे, खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, गारमेंट व्यावसायिक जयराज बजाज, प्लेसमेंट सेलचे प्रभारी जयंत चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत अंजली देशमुख, सतीश माळोदे, मंजूषा वाठ, विशाखा सावजी, शिवानंद कुमार यांनी केले.
-------------------
नैसर्गिक रंगापासून तयार केली वस्त्रे
टाकाऊ फुले, झाडांच्या पानांपासून नैसर्गिक रंग तयार करण्यात आला आणि या रंगापासूनच वस्त्रे तयार केली आहेत. व्हीएमव्हीच्या टेक्सटाईल विभागाने हे नवे संशोधनात्मक कार्य केले आहे. अमरावती येथे टेक्सटाईल हब निर्माण झाले असून, आता अशा उद्योगांची गरज आहे. त्यामुळे व्हीएमव्हीत ‘मिनी टेक्सटाईल लॅब’ झाल्यास बचतगटांच्या माध्यमातून टेक्सटाईलमध्ये मोठे कार्य उभे करता येईल. डीपीसीतून या लॅबसाठी निधी उपलब्ध करण्यासाठीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. टेक्सटाईल विभागाकडून नैसर्गिक रंगापासून तयार केलेले वस्त्रे फॅशन शोमध्येदेखील परिधान केले जातात, अशी माहिती सतीश माळोदे यांनी दिली.