अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बसवरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
By जितेंद्र दखने | Published: March 18, 2024 09:24 PM2024-03-18T21:24:39+5:302024-03-18T21:26:29+5:30
Amravati News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत.
- जितेंद्र दखने
अमरावती - लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटी बसेसवरील शासकीय जाहिरातींचे फलक तातडीने काढण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विभागातील २५० हून अधिक बसेसवरील शासकीय जाहिराती काढण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी एसटी महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसवर ‘निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान’ या राज्य शासनाच्या आणि अन्य राजकीय जाहिराती तत्काळ हटविण्याच्या सूचना एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रक तसेच एसटी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये, याअनुषंगाने एसटी बसवरील राजकीय जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
राजकीय जाहिराती काढण्यास टाळाटाळ केल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावरून घेण्यात यावी, अशा सूचना महामंडळाने दिल्या हाेत्या. याअनुषंगाने अमरावती विभागाचे विभाग नियंत्रक यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या ८ आगारातील ३४३ एसटी बसेसवरील २५० बसेसवर असलेल्या शासकीय व राजकीय जाहिरातींचे लावलेले फलक हटविण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार एसटी २५० बसेसवरील जाहिरातींचे फलक हटविलेले आहेत.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती