‘त्या’ आजोबाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:02+5:30
आजोबाचा खून करण्यापूर्वी आजीला अकोला घेऊन जाणे, रेल्वेने गुपचूप तळणी गाठणे, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दगड - विटा घरामागे फेकून देणे व काहीच झाले नाही, या आविर्भावात अकोला परतून कुटुंबांसोबत रममान होणे, हे सर्व मुद्दे ‘कोल्ड ब्लडेड’ मर्डर’कडे अंगुलीनिर्देश करणारे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : लहानपणी ज्या दोन नातवांना अंगाखांद्यावर खेळविले, न्हाऊ माखू घातले. ज्यांचे लाड पुरविले, त्यांनीच प्रतिकारशक्ती गमावलेल्या आजोंबाचा खून केला. आजोबाचा खून करण्यापूर्वी आजीला अकोला घेऊन जाणे, रेल्वेने गुपचूप तळणी गाठणे, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दगड - विटा घरामागे फेकून देणे व काहीच झाले नाही, या आविर्भावात अकोला परतून कुटुंबांसोबत रममान होणे, हे सर्व मुद्दे ‘कोल्ड ब्लडेड’ मर्डर’कडे अंगुलीनिर्देश करणारे आहेत. मंगरुळ दस्तगीरच्या ठाणेदारांनीही आरोपींनी रचलेल्या कटाची माहिती घेतली, तेव्हा तेही शहारले.
गुरुवारी तळणी येथील देवराव नागोजी डिवरे (७५) या वृद्धाची त्यांच्या दोन सख्खे नातू असलेल्या चेतन मारुती डिवरे व योगेश डिवरे यांनी दगडाने ठेचून हत्या केली. मृत देवराव डिवरे यांचा मोठा नातू आरोपी चेतनला पत्नी व एक मुलगी आहे. मात्र, अनेक वर्षांपासून त्याला वरली मटका, जुगार खेळण्याचा नाद जडला आहे. आपल्या आजोबांनी तीन एकर शेतीची विक्री केली. मात्र, त्यातून आपल्याला कुठलीही रक्कम दिली नाही. त्यामुळे चेतन नेहमी तळणी येथे येऊन देवराव यांना पैशाची मागणी करीत होता. दरम्यान दोन वेळा त्याने आजोबाला जीवे मारण्याची धमकीसुद्ध दिल्याची माहिती नातेवाईकाकडून मिळाली आहे.
मोठ्या नातवाने रचला हत्येचा कट
आरोपी चेतन हा मृत देवराव यांची पत्नी तथा स्वत: च्या आजीला दवाखान्यात उपचाराच्या बहाण्याने अकोला येथे घेऊन गेला. त्यानंतर त्याने आजोबाच्या हत्येचा कट रचला. लहान भाऊ योगेशला कटात सामील करून घेतले. घटनेच्या पहिल्या दिवशी लहान भाऊ योगेशला आपण वर्धा येथे जाऊ, म्हणून त्याला तळणी येथे आणले. त्यानंतर रेल्वे स्थानकावरून तळणी येथे रात्री १२.३० वाजता पोहोचले. त्याने लहान भावाला आजोबाला आवाज देण्यास सांगितले. दरवाजा उघडताच देवराव यांना पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने प्रथम हाताच्या ढोपराने त्यांना मारले. लकवाग्रस्त देवराव जमिनीवर तडफडत राहिले. लगेच बाजूची वीट चेतनने देवराव यांच्या डोक्यात हाणली. देवराव जागीच गतप्राण झाले. रक्ताचे डाग दिसू नयेत, म्हणून देवराव यांच्या स्वेटरवर लागलेले रक्ताचे डाग चेतनने पुसले. तळणी रेल्वे स्थानक परिसरात रक्ताने माखलेले स्वेटर अर्धवट जाळून टाकले. संशय येऊ नये म्हणून रात्रीच अकोला गाठल्याचे आरोपींच्या बयाणातून स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी पुन्हा तळणीत
आपल्याला काही माहितीच नाही, या आविर्भावात शुक्रवारी सकाळी आजोबाच्या मृत्यूची माहिती मिळताच चेतन व योगेश आई वडिलांसोबत तळणी येण्यासाठी निघाले. ही सर्व हकीकत आरोपी चेतन व योगेश यांनीच मंगरूळ दस्तगीर पोलिसांना दिली. आरोपी चेतन व योगेशच्या वडील व काकांडून चालणेही होत नाही. मात्र, काकांनीच पोलीस ठाणे गाठून वडिलांच्या हत्येची फिर्याद दिली.
दोन्ही आरोपींनी आजोबाच्या हत्येची कबुली दिली. शेतीच्या पैशाच्या वादातून हत्येची ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कोठडीदरम्यान प्रकरणाचे अधिक वास्तव उघड होईल.
- दीपक वळवी,
पोलीस निरीक्षक, मंगरूळ दस्तगीर