अपहरणात आजी सूत्रधार, पोलिसांना बक्षिसाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:00 AM2021-02-21T05:00:00+5:302021-02-21T05:01:12+5:30

मोनिकाचे आई-वडील लहानपणीच वारले. ज्या गृहस्थाने तिचे पालनपोषण केले, त्यांना ती अधूनमधून पैसे पाठवित असे.  त्यांना तगडी रक्कम मिळवून देता यावी, या लालसेने ती नातवाच्या अपहरणनाट्यात सहभागी झाली.   हिनाने मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू याला सहभागी करून घेतले. त्याने बंबईया ऊर्फ अलमास ताहीर शेख व आसिफ युसूफ शेख यांना हिनाच्या सोबतीला दिले.  हिना आणि हे दोघे अमरावतीत मुक्कामी होते.

Grandmother abducted in kidnapping, reward announced to police | अपहरणात आजी सूत्रधार, पोलिसांना बक्षिसाची घोषणा

अपहरणात आजी सूत्रधार, पोलिसांना बक्षिसाची घोषणा

Next
ठळक मुद्देसीपींची पत्रपरिषद, मास्टरमाईंड इसार शेख टकलू फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  बहुचर्चित अपहरण प्रकरणात ‘त्या’ चिमुकल्या मुलाची आजीच मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.  
शहर पोलिसांचे पथक  किडनॅपर्सच्या तावडीतून सोडविलेल्या  चार वर्षीय मुलाला घेऊन अहमदनगरहून शनिवारी सकाळी अमरावतीत परतले. पाच आरोपींना अहमदनगरहून तर मुलाची   आजी मोनिका उर्फ प्रिया उर्फ मुन्नी जसवंतराय लुणीया (४७) हिला शनिवारी अमरावतीतून अटक केली.  खंडणीसाठीच  मुलाचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पत्रपरिषदेत सांगितले. 
नागपूर शहरात काही वर्षांपूर्वी दोन मुलांचे अपहरण करून त्यांची आरोपींनी हत्या केल्याची प्रकरणे डोळ्यासमोर होती. त्यामुळे  हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळून आरोपींचा शोध व मुलाला सुखरुप आणणे हे महत्त्त्वाचे होते. अमरावती, अहमदनगर येथील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आम्ही गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचू शकलो, अशी माहिती आरती सिंह यांनी दिली.
प्रकरणात आतापर्यंत सपना ऊर्फ हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५), बंबईया ऊर्फ अलमास ताहीर शेख (१८),  मुसाहीब नासीर शेख (२४), आसिफ युसूफ शेख २४), फिरोज रशीद शेख (२५, सर्व रा. कोठला अहमदनगर) या पाच जणांना अहमदनगर येथून  अटक केली आहे. 
मुलाची आजी मुलगा वास्तव्याला असलेल्या अमरावतीतील शारदानगर येथील घरी राहत होती. अमरावती पोलिसांना आजीवर सुरुवातीपासूनच संशय होता, हे उल्लेखनीय.

तपासातील प्रत्येकाला ५० हजारांचे बक्षीस
चिमुकल्याला शोधून काढणारे राजापेठ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस  तसेच अहमदनगर येथील गुन्हे शाखा व तपासात सहभागी इतर पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जाहीर केले. सदर फंड मिळण्याकरिता राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.

पोलीस मास्टर माईंडच्या मागावर
अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू (रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध तेथे २००५ ते २०१८ दरम्यान अपहरण, चोरी, घरफोडी सारखे तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर गुन्हे शाखा व अमरावती पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत. 

अन् सीपी झाल्या भावूक

मलाही चार वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे अपहृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांची, विशेषत: आईची मनोदशा काय झाली असेल, याची मला कल्पना आहे, असे उद्गार शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी काढले. पत्रपरिषद सुरू असताना अपहरण झालेल्या चिमुकल्याला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले. तो येताच आपला रियल हीरो आला, असे उद्‌गार पोलीस आयुक्तांनी काढले. त्याला जवळ घेऊन चॉकलेट दिले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

तीन अपहरणकर्त्यांचा अमरावतीतील लॉजवर आठ दिवस मुक्काम

अमरावती : अपहरणापूर्वी तीन आरोपी शहरातील चित्रा चौक आणि रेल्वे स्दस्थानक परिसरातील विविध दोन लॉजवर तब्बल आठ दिवस मुक्कामी होते. अपहरणाच्या घटनेला मूर्त रूप देण्यासाठीचा आवश्यक अभ्यास या आरोपींनी त्यांच्या या मुक्कामादरम्यान केला. 
 अपहृत चिमुकल्याची सावत्र आजी मोनिका आणि अपहरणकर्त्यांपैकी एक हिना या दोघीही  अहमदनगरच्या. दोघींच्या वयात मोठी तफावत असली तरी   एकमेकींच्या त्या जीवलग मैत्रिणी मैत्रिणी. हिना अमरावतीला मोनिकाकडे अधूनमधून यायची.  आठ-पंधरा दिवस वास्तव्याला असायची. त्यामुळे अपहृत चिमुकल्याशी तिची ओळख अन् जवळीकही होती. 
मोनिकाचे आई-वडील लहानपणीच वारले. ज्या गृहस्थाने तिचे पालनपोषण केले, त्यांना ती अधूनमधून पैसे पाठवित असे.  त्यांना तगडी रक्कम मिळवून देता यावी, या लालसेने ती नातवाच्या अपहरणनाट्यात सहभागी झाली.   हिनाने मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू याला सहभागी करून घेतले. त्याने बंबईया ऊर्फ अलमास ताहीर शेख व आसिफ युसूफ शेख यांना हिनाच्या सोबतीला दिले.  हिना आणि हे दोघे अमरावतीत मुक्कामी होते. घराची रेकी केली. ठरल्यानुसार बुधवारी अपहरण केले. सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी अमरावतीत मुक्काम करून किडनॅपिंग प्लॅन आखला, याची टीप पोलिसांना मिळू शकली नाही. 

आरोपींना २८ पर्यंत पोलीस कोठडी
राजापेठ ठाण्यात भादंविचे कलम ३६२, ३४ अन्वये दाखल प्रकरणात कलम ३६४ अ, १२० ब या कलमा वाढविण्यात आल्या. अहमदनगरहून पाच आरोपी व अमरावती येथून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

 

Web Title: Grandmother abducted in kidnapping, reward announced to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण