खरेदीची उत्तम वेळ, घरे महागणार !
By admin | Published: May 25, 2017 12:07 AM2017-05-25T00:07:48+5:302017-05-25T00:07:48+5:30
नोटबंदीनंतर आलेली मंदी हाच ग्राहकांसाठी घरे खरेदीचा उत्तम काळ असून येणाऱ्या काही दिवसांत घराच्या किमती महागणार असल्याचा सूर....
लोकमतचा उपक्रम : बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाईने केले ‘रेरा’चे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोटबंदीनंतर आलेली मंदी हाच ग्राहकांसाठी घरे खरेदीचा उत्तम काळ असून येणाऱ्या काही दिवसांत घराच्या किमती महागणार असल्याचा सूर बिल्डर्स असोसिएशन क्रेडाई अमरावतीच्या चर्चेतून उमटला. ‘लोकमत’ने रिअल इस्टेट (रेग्युलेशन अॅण्ड डेव्हलपमेंट) अॅक्ट (रेरा)च्या अनुषंगाने येथील ‘लोकमत’ भवनात ही सांघिक चर्चा आयोजित केली होती.
ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्या हितार्थ केंद्र शासनाने १ मे २०१७ पासून ‘रेरा’ लागू केला. या चर्चासत्रादरम्यान बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीने या कायद्याचे मनापासून स्वागत केले. बांधकाम व्यवसायात गुणवत्ता, दर्जा आणि वचनबद्धता याच मिलाफाला आता थारा मिळेल. बिल्डर्सच्या नावावर सामान्यांची फसवणूक करणाऱ्या चकटफूं ना चाप बसणार असल्याची अपेक्षा बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केली.
बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीचे सर्व सदस्य नियमितपणे दर्जा आणि गुणवत्तेचे पालन करीत आले आहेत. लोकांच्या स्वप्नातील घरे बांधून देण्याच्या व्यवसायाशी आम्ही संबंधित आहोत. आमच्यासाठी प्रॉडक्ट असलेले घर सामान्यांसाठी हृदयस्थ विषय असतो याची आम्हाला जाण आहे. अवघ्या आयुष्याची कमाई गुंतवून घर खरेदी केले जाते. हे आम्ही जाणतो. ग्राहकांना म्हणूनच सेवा, दर्जा आणि विश्वसनीयता प्रदान करणे यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो; तथापि ग्राहकांच्या याच भावनिकतेचा फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या काही व्यवसायिकांनी अलिकडे डोके वर काढले होते. अशा काही संधीसाधू व्यावसायिकांमुळे अवघा बांधकाम व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. खऱ्या खोट्याची जाण चिकित्सक ग्राहकांना असली तरी बांधकामाबाबतचे नियम माहिती नसलेले भोळे ग्राहक संधीसाधू व्यावसायिकांच्या फसवणुकीला बळी पडत होते. ‘रेरा’मुळे आता बांधकाम व्यवसायात शुद्धता येणार आहे. ग्राहकांना संरक्षण मिळणार आहे. बांधकाम व्यवसायाशी ज्याची प्रामाणिकता जुळली आहे, ग्राहक हा ज्यांच्यासाठी केंद्रबिंदू आहे, अशीच मंडळी या व्यवसायात टिकू शकणार आहे. वाढू शकणार आहे, अशा भावना बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीने चर्चेदरम्यान व्यक्त के ल्यात.