लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: ती लग्न करणार.. की करणार नाही.. या संभ्रमात असलेल्या एका युवकाने आपल्या भावी पत्नीविरुद्ध थेट पोलिसात तक्रार नोंदवून टाकल्याची घटना चांदूररेल्वे येथे घडली. एरव्ही वराविरुद्ध तक्रारीच्या घटना घडलेल्या दिसतात. मात्र वधूविरुद्धच्या तक्रारीची ही घटना आगळीच असल्याने या परिसरात त्याची चर्चा होते आहे.
यासंदर्भातील हकिकत अशी की, महालक्ष्मीनगरातील ३२ वर्षीय युवकाचे मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या २१ वर्षीय तरुणीशी लग्न जुळले. दोघांचा साखरपुडाही झाला. मात्र काही काळानंतर त्या वधूने व तिच्या प्रियकराने भावी वराला गाठून आपण लग्न करणार असल्याचे सांगितले. हा धक्का सहन न होऊन वराने सारी माहिती घरच्यांना दिली. दोन्ही कुटुंबात चर्चा झाली. अखेरीस वधू या लग्नाला तयार असल्याचा निरोप तिच्या आईवडिलांनी दिल्याने सगळ््यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता आपले लग्न होणार या आनंदात असलेल्या वराने भावी वधूला १८ हजारांचा मोबाईलही भेट म्हणून दिला.
एवढे सगळे घडल्यानंतर लग्नाच्या अगदी काही दिवस आधी वधूने पुन्हा लग्नाला नकार दिला. यावेळी मात्र वर व त्याच्या घरच्यांचा संताप झाला. दोन्ही कुटुंबात कडाक्याची भांडणे झाली आणि वराने थेट पोलिस ठाणे गाठून वधूविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हा गुन्हा २७ जून रोजी दाखल केला असून, तपास सुरू आहे.