फोटो पी ०९ शिरजगाव कसबा
चांदूर बाजार : शिरजगाव कसबा पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारूविक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत चार आरोपींकडून ११५ लिटर गावठी दारूसह ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यात संचारबंदीमुळे दीड महिन्यांपासून सरकारमान्य दारूविक्रीवर प्रतिबंध आहे. यामुळे तालुक्यात अवैध हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तालुक्यातील चार गावे सील करण्यात आली आहेत. यात शिरजगाव कसबाचासुद्धा समावेश आहे. या गावात प्रवेशबंदी असल्याने गावातल्या गावातच गावठी दारूच्या अवैध विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरजगाव कसबा पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी छापे घालून गावठी दारू जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. पहिल्या घटनेत आरोपी माणिक दशरथ दुर्वे (५०, रा. शिरजगाव कसबा) याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू जप्त केली. दुसऱ्या घटनेत आरोपी शमीउल्ला अताउल्ला (५४, रा. शिरजगाव कसबा) यांच्याकडून रबरी ट्यूबमध्ये असलेली १२ हजार ५०० रुपयांची २५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.
अन्य एका घटनेत शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आरोपी नवल ऊर्फ सुरेश बदुकले (२७) व सुरेश महादेव बदुकले (५८, दोन्ही रा. शिरजगाव कसबा) हे दोघे अवैध हातभट्टीच्या दारूची अवैध वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांची ६० लिटर गावठी दारू व एमएच २७ टी ३२६९ ही दुचाकी असा एकूण ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र टेकाडे व हेडकॉन्स्टेबल भुवनेश्वर तायडे यांनी केली.