गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ‘त्यांनी’ पोलीस ठाण्यात घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 05:00 AM2021-09-24T05:00:00+5:302021-09-24T05:00:56+5:30
एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन पोक्सो व बलात्काराची तक्रार देण्यात आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या ठाणेदारांना मिळाली. आरोप असलेला पळून जाऊ नये म्हणून ठाणेदारांनी तातडीने संबंधित गाव गाठले. जवंजाळ यांना ताब्यात घेऊन गुरुवारी दुपारी ३.५० च्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. अवघ्या पाच मिनिटात दुपारी ३.५५ च्या सुमारास त्यांनी गळफास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर आयुक्तालयातील वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी दुपारी ३.५५ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या ३४ दिवसांमधील पोलीस ठाण्यातील आत्महत्येची अमरावती आयुक्तालयातील ही दुसरी घटना ठरली आहे. वलगाव पोलीस ठाण्यात याआधी सन २०११ मध्ये एक ‘डेथ इन कस्टडी’ झाली होती, हे विशेष.
अरुण बाबाराव जवंजाळ (५०, ता. भातकुली, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, पंचनाम्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व भातकुलीचे उपविभागीय अधिकारी व शासकीय वैद्यकीय अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. वृत्त लिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्तद्वय विक्रम साळी व शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुुंबरे, सर्व ठाणेदार व मोठा फौजफाटा तैनात होता.
सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर व उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी तपासाची प्रक्रिया आरंभली आहे.
महिला पोलीस निलंबित
याप्रकरणी स्टेशन डायरीवरील पोलीस महिलेला (एलपीसी) तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर ठाणेदार गोरखनाथ जाधव यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. वलगावच्या ठाणेदारपदाचा तात्पुरता पदभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्याकडे देण्यात आला. घटनेच्या वेळी आपण ‘फ्रेश’ होण्यास गेलो होतो, असे त्या निलंबित एलपीसीने आपल्या बयानात सांगितले आहे.
अवघ्या पाच मिनिटात घात
एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन पोक्सो व बलात्काराची तक्रार देण्यात आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या ठाणेदारांना मिळाली. आरोप असलेला पळून जाऊ नये म्हणून ठाणेदारांनी तातडीने संबंधित गाव गाठले. जवंजाळ यांना ताब्यात घेऊन गुरुवारी दुपारी ३.५० च्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. अवघ्या पाच मिनिटात दुपारी ३.५५ च्या सुमारास त्यांनी गळफास घेतला.
मागच्या खोलीत आत्मघात?
वलगाव पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीवर गुरुवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास अल्पवयीन फिर्यादीचे बयाण नोंदविणे सुरू असताना अरुण जवंजाळ यांना ताब्यात घेऊन वलगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत बसवून ठेवण्यात आले. ते तेथे एकटेच होते. ती संधी साधत त्यांनी स्वत:च्या शर्टच्या साहाय्याने तेथील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघड झाला. जवंजाळ यांच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सोचा गुन्ह्याची नोंद दुपारी ४.४४ वाजता करण्यात आली.
१९ ऑगस्टच्या घटनेला उजाळा
१९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केलेल्या सागर ठाकरे या तरुणाने राजापेठ पोलीस कोठडीत शर्टाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गुरुवारच्या वलगाव येथील घटनेतदेखील शर्टाचाच वापर करण्यात आला. त्या प्रकरणाचा तपास अमरावती सीआयडी करीत आहे. वलगावची ही आत्महत्या स्टेशन डायरीलगतच्या खोलीत झाली.
सीआयडीने घेतला ताबा
अमरावती सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर व उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी तातडीने वलगाव पोलीस ठाणे गाठले तथा प्रकरणाशी संबंधित दस्तावेज ताब्यात घेतला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले जाणार आहेत. रात्री ९ पर्यंत मृतदेहाचा पंचनामा झालेला नव्हता. उत्तरीय तपासणी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.