अमरावती: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले अजूनही म्हणावी तशी ही लाट ओसरलेली नाही. हा वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्याला सध्या तरी एकच उपाय आहे. तो म्हणजे लसीकरण आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे होय.
शहरी भागात बहुतांश सुरक्षित वर्ग असल्याने त्यांच्यामध्ये याबाबत फारशी जनजागृती करण्याची गरज पडत नाही. मात्र आदिवासी क्षेत्रात अज्ञान समज-गैरसमज असल्याने त्यांच्यात याबाबत जनजागृतीची गरज ओळखून जिल्हा परिषद प्रशासनाने व आदिवासी विकास विभागाने जनजागृतीवर भर दिला आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा या आदिवासी क्षेत्रात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी गावपातळीवर ग्राम दक्षता कमिटीच्या माध्यमातून सरपंच, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे प्रबोधन करत कोरोना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला पहिल्यापेक्षा निश्चितच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी क्षेत्रातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.