दुसऱ्या दिवशीही पावसाची जिल्ह्यात जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:01:00+5:30
नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर/धारणी : मान्सूनच्या अखेरीस आता होत असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढले. अमरावती शहरासह जिल्हाभरात शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे सोयाबीनचे मातेरे झाले. त्यासोबतच कापूसही भिजला आहे. संत्राउत्पादकांनाही शेतात फळांचा सडा पहावा लागत आहे.
नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.
धारणी परिसरातही पावसाने सोयाबीन, कपाशी आणि तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वेसह जिल्हाभरातील बागायती संत्रा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीची शेते पांढरी शुभ्र झाली आहेत. परंतु, वेचण्याकरिता मजूर मिळत नसल्यामुळे तो ओला होऊन मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. संत्र्याची आंबिया बहराची फळे गळाली आहेत. त्यांचा सडा झाडाखाली दिसून येत आहे. शेंदोळा येथील एका शेतकऱ्याचे चार एकरातील कापलेले सोयाबीन पाण्यावर तरंगले. शिरजगावात संत्र्याचा सडा पडला.
दरम्यान, अमरावती, अचलपूर, धारणी, वरूड, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभर पाऊस झाला, तर सायंकाळी अर्धा ते दीड तासांपर्यंत टपोऱ्या थेंबांनी झोडपून काढले. या पावसामुळे खरीप हंगाम हातचा जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये दाटली आहे.
बाजार समितीत गहू, सोयाबीन भिजले
अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल दुपारी ३ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केला. व्यापाऱ्यांनी तो गोदामात नेण्यास उशीर केल्याने रात्रीच्या पावसाने सोयाबीन आणि गहू काही प्रमाणात भिजला. बाजार समिती रविवारी बंद राहत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शनिवारी शेतमाल विक्रीला आणला नाही.