हॅलोऽऽऽ अमरावती कारागृह ‘गूड मॉर्निंग’
By admin | Published: April 15, 2016 12:06 AM2016-04-15T00:06:10+5:302016-04-15T00:06:10+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून ....
गणेश वासनिक अमरावती
येथील मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून बंदीजनांची सकाळ आता ‘हॅलो...अमरावती कारागृह’ या स्वराने होत आहे. दुपारी १२ ते ३ वाजताच्या दरम्यान ‘कैद्यांची फरमाईश’ हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कैद्यांना चांगला विरंगुळा मिळत आहे.
नकळत झालेल्या चुकांची शिक्षा पाषाण भिंतींच्या आड भोगणाऱ्या कैद्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, यासाठी कारागृह प्रशासनाच्यावतीने सुधारणा व पुनर्वसनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमिवर १ जानेवारीपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधा सुरू झाली आहे.
भक्तीगीतांची बंद्यांची फरमाईश
अमरावती : चार भिंतीच्या आत देश, विदेशातील घडामोडींची माहिती बंद्यांना मिळावी, याकरीता दैनंदिन पेपर वाचन अंतर्गत सकाळी ८.३० ते ९ वाजेदरम्यान वृत्तपत्रांचे वाचन केले जाते. यात महत्त्वाच्या घडामोडींसह राज्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक बातम्यांचे प्रसारण केले जाते. सकाळी ७ वाजतापासून सुरु झालेले रेडिओवरील कार्यक्रम दुपारी ३ वाजेपर्यंत पुरुष व महिला कैदी श्रवण करतात. कारागृहातील १६ बराकींमधील कैद्यांना रेडिओवरील कार्यक्रम श्रवण करता यावेत यासाठी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदीजनांच्या मनात काही वेळा नैराश्याची भावना निर्माण होेते.कायद्याचे उल्लंघन करण्याचे विचार मनात घर करू लागतात त्यामुळे रेडिओवरून श्रवणीय कार्यक्रम प्रसारित केल्यास त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते, असे कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेडिओवर सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांमधून बंदीजनांचे मतपरिवर्तन करण्यास मदत मिळत असल्याचा दावा कारागृहाने केला आहे. कारागृहात विविध जाती, धर्माचे कैदी आहेत. त्यामुळे भक्तिगीते, भजन, कव्वाली, भीम-बुद्ध गीते, कीर्तन अशा विविध गीतांचे प्रसारण रेडिओवरून केले जाते. रेडिओकेंद्र हाताळण्याची जबाबदारी सुदर्शन विघ्ने नामक कैदी यशस्वीपणे हाताळत आहे.
२कारागृहाचे अंतर्गत सुरक्षा अधिकारी प्रशांत नागवाडे व प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांच्याकडे रेडिओ केंद्राची देखभाल व्यवस्था सोपविली आहे. बंदीजनांना थोर-महात्म्यांच्या विचारांची जाण व्हावी, यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेंतर्गत तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तिंची व्याख्याने आयोजित करुन रेडिओमार्फत ती कैद्यांपर्यंत पोहोचविली जातात. रेडिओ जॉकी, रेडिओ मिर्ची, रेडिओ एसीपी अशा अन्य नावाने कार्यक्रम राबवून बंदीजनांचे मतपरिवर्तन करण्यासाठी रेडिओकेंद्र कारागृहासाठी लाभदायी ठरु लागले आहे.
प्रत्येक बराकीत लावले बॉक्स
मध्यवर्ती कारागृहातील १६ बराकीत बंदीजनांना आवडीचे गाणे ऐकता यावे, यासाठी ‘हॅलो फरमाईश’ या कार्यक्रमातून गाण्यांचा आस्वाद घेता येतो. मात्र, फरमाईशचे गाणे ऐकण्याकरीता बंद्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक बराकीत बॉक्स लावण्यात आले आहेत. ‘हॅलो फरमाईश’ हा कार्यक्रम दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान प्रसारित केला जातो. त्यामुळे बंद्यांना सकाळी ९ वाजतापूर्वीच गाण्याची यादी बॉक्समध्ये टाकावी लागते. त्यानंतर बंद्यांनी फरमाईश केलेली गाणी इंटरनेटवरून डाऊनलोड केली जातात. ‘हॅलो फरमाईश’ या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर यांनी दिली.