वसाडच्या हेंबाडे बंधूंना बैलजोड्यांचा नादच खुळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:09+5:302021-09-06T04:16:09+5:30
पाच बैल जोड्यावर करतात चाळीस एकर शेती २३ लाखाचे उत्पन्न लोकमत पोळा विशेष पान ३ बॉटम आज पोळा, घरीच ...
पाच बैल जोड्यावर करतात
चाळीस एकर शेती
२३ लाखाचे उत्पन्न
लोकमत पोळा विशेष
पान ३ बॉटम
आज पोळा, घरीच करतात उत्सव साजरा, गोपालनातून शेतीची समृद्धी
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतात नांगरणी असो की वखरणी, सरे पाडणे किंवा पेरणी, ही कामे झटपट व्हावी म्हणून ट्रॅक्टरचा वापर प्रत्येक शेतकरी करतो. मात्र, वसाडच्या हेंबाडे बंधूंचा नांदच खुळा. घरीच असलेल्या गिर गाईचे गोऱ्हे मोठे झाले की, बैलाची शिकवण देऊन शेताच्या मशागतीसाठी वापरले जाते. पाच बैलजोड्यांवर ४० एकर शेती कसून वर्षाला २३ लाखांचे उत्पन्न हे शेतकरी कुटुंब घेत आहे.
शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत आहे. यांत्रिकी युगात बैलाजोड्या कमी झाल्याने अनेक गावांमध्ये हा पोळा आयोजित केला जात नाही. मात्र, धामणगाव तालुक्यातील वसाड येथील हेंबाडे बंधूंनी बैलजोड्या जोपासण्याचा छंद जोपासला आहे. देवराव हेंबाडे यांना चार मुले. शावराव व पद्माकर हे दोघे भाऊ एकत्र, तर भारत आणि बंडू यांचे विभक्त कुटुंब आहे. यांत्रिकी शेतीच्या युगातही शावराव व पद्माकर यांच्याकडे पाच बैलजोड्या आहेत. शेतीत सरे पाडणे, पेरणी ही कामे बैलजोडीने केली जातात. मजुरांचा वानवा असल्याने कपाशीमध्ये थोडे जरी तण वाढताना दिसले तरी लगेच डवरणी करता येते.
आमच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. वडिलांना बैलजोडी घरी ठेवण्याची आवड होती. आम्ही दुग्ध व्यवसायाची जोड घेत वर्षानुवर्षे आलेल्या शेतीच्या उत्पन्नातून चाळीस एकर शेती घेतली. उन्हाळ्यात नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होत असला तरी वर्षभर बैलजोडीचा शेतात मशागतीसाठी वापर करीत असल्याचे हेबांडे बंधू सांगतात.
शेताला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोड
हेबांडे कुटुंबाकडे ४० गीर गाई, आठ गावरान म्हशी व १२ जर्सी गाई आहेत. सन १९८४ पासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. दररोज ८० लिटर दूध धामणगाव शहरात पाठविले जाते. आलेल्या रकमेतून घरखर्चासोबत शेतावर असलेल्या गड्यांचा पगार दिला जातो. घरच्या गीर गाईपासून झालेल्या गोऱ्ह्यांना वयात येताच उन्हाळ्यात बैल म्हणून प्रशिक्षित केले जाते. आज दहा बैल घरच्या गीर गाईंचे आहेत. या पशूंपासून दरवर्षी निघणाऱ्या शेणखताचा वापर शेतात करीत असल्याने पिकांचे उत्पादन स्थिर राहत असल्याचे शावराव हेबांडे म्हणाले.
घरीच भरवितात पोळा
कुटूंबातील सदस्यांप्रमाणे बैल वर्षभर शेतात राबतो. कोरोनामुळे मागील वर्षापासून पोळा भरविण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकणे, त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जातात आणि गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवून घरीच तोरण बांधून हेबांडे कुटुंब घरीच पोळा भरवितात