लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरानापासूनच्या बचावासाठी उठसूठ सर्वांनीच सूचविलेल्या मालेगाव काढ्याच्या अतिसेवनाने अनेकांना मुळव्याधीचा, आम्लपित्ताचा आणि पोटासंबंधीचा त्रास सुरू झाल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे.उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या 'मालेगाव पॅटर्न' काढयाचे सेवन करावे, असे आवाहन समाजातील अनेक जबाबदार घटकांनी सामान्य जनतेला केले. अमरावती महानगरात आणि ग्रामीण भागात मोक्क्याच्या ठिकाणी स्वत:च्या छायाचित्रांसकटचे विशाल बॅनर्सही त्यासाठी अनेकांनी लावले. व्हॉटस अॅपवर तर मालेगाव काढ्याच्या सामग्रीची आणि ती तयार करण्याच्या विधीची धूम अनेकांनी अनुभवली आहे. वळणदार अक्षरांमध्ये काढ्यासंबंधीची साधनसामग्री आणि विधी लिहून माहिती प्रसारित करणारे अनेक आहेत. मालेगाव काढा घ्याच, असा आग्रह धरणारेही भरपूर. त्यामुळे दुकानदारांनी मालेगाव काढ्याच्या सामग्रीचे मिश्रण असलेले पॅकेट्सदेखील बाजारात आणलेत. कोरोनाच्या भयाचा ज्या गतीने प्रसार झाला तसाच प्रचार, प्रसार मालेगाव काढ्याचाही झाला. हा काढा कोरोनाप्रतिबंधासाठीचा हमखास उपाय असल्याचा दृढ विश्वासही अनेकांच्या मनात तयार झाला. या धडपडीमागील भावना शुद्ध असल्या तरी आपण सूचवितो ती आयुर्वेदीक औषधी आहे आणि औषधी सतत आणि अतिप्रमाणात प्यायली जाऊ नये, याची आवर्जून जाणीव करून देणेही आपले कर्तव्य आहे, हा मुद्दा काढ्याचा प्रचार, प्रसार करणारे विसरले.आजार श्वसनसंस्थेत, सेवन पोटातश्वसनसंस्थेशी संबंधित असलेल्या कोराना या आजारासाठी काढा पोटात घ्यावा लागतो. तो अतिप्रमाणात आणि सतत सेवन केल्यास आतड््यांना काढा पचविण्याचे अधिक आणि सतत श्रम करावे लागतात. चयापचयातून निर्माण होणारी उष्णता शरीरात संतुलीत केली गेली नाही तर त्याचे विपरित परिणाम पचनसंस्थेवर दिसू लागतात. हायपरअॅसिडिटी, मुळव्याध, पोटासंबंधीचे इतर आजार त्यामुळे उद्भवू शकतात, उमळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.शास्त्रीय सिद्धता नाहीकाढ्यातील औषधी गुणधर्माने उष्ण असल्यामुळे कफदोष प्रतिबंध करण्यासाठी त्या उपयोगी ठरू शकतील. परंतु कोराना प्रतिबंधासाठीचा तो खात्रिलायक उपाय आहे, असे शास्त्रिय आधाराशिवाय जाहीरपणे म्हणता येणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मालेगावात कोरोनामुक्त होणाऱ्यांना काढा सहायक ठरला असेलही; परंतु काढ्यामुळेच कोराना बरा झाला किंवा कोरानाप्रतिबंधासाठीची रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली, असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. आजार बरा होताना रुग्णांची शारीरीक क्षमता, शरीरप्रकृती, रोगप्रतिकार क्षमता, शरीरात नव्याने निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, आहारपद्धती, आवश्यक घटकांची कमतरता, औषधींना प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती, संक्रमण केलेल्या विषाणूचे स्वरुप, त्याची घातकता आदी अनेक बाबीही महत्त्वपूर्ण ठरतात, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.साईडइफेक्ट नाही, हा गैरसमजचआयुर्वेदाच्या औषधींचा कुठलाही साईडइफेक्ट होणार नाही, असे सर्रास बोलले जाते. खरे तर ज्या औषधीचा इफेक्ट असतो त्याचा साईड इफेक्टही अर्थात्च असतो. आजारानुसार, शरीरानुसार, विधीनुसार योग्य मात्रेत सेवन केलेली औषधी आजार नष्ट करण्यासाठी उपायकारक ठरते. परंतु जादा मात्रेत घेतलेली औषधी शरीराला अपायकारकही ठरू शकते.मालेगाव काढा शासनमान्य नाहीप्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाने मालेगाव काढा अधिकृत केलेला नाही. शासनाकडे मालेगाव काढ्याच्या सेवनाने कोराना संक्रमण प्रतिबंधीत झाल्याचे कुठलेही एव्हिडन्सेस उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत मालेगाव काढा स्वत:हून जाहिरपणे सूचविणे आणि सर्वंकष माहितीच्या अभावामुळे नागरिकांना त्याच्या अतिसेवनाने मुळव्याधीसारखे आजार उद्भवणे हे प्रकार किती योग्य, असा प्रश्न उपस्थित होतो.शरीरात जाणाºया औषधींबाबत पूर्णत: सजग असणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात काय जात आहे, त्याचे नेमके लाभ काय, काही दुष्परिणाम आहेत काय, शासनाच्या त्यासंबंधाने काही मार्गदर्शक सूचना आहेत काय, हे नागरिकांनी जाणून घ्यायला हवे. एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होऊ शकते.आयुर्वेदाच्या औषधीचा साईडइफेक्ट असू शकतो याची कल्पना नव्हती. महिनाभर रोज सकाळसंध्याकाळ मालेगाव काढा प्यायलो. पुढील दोन महिने रोज रात्री काढा घेतला. आता मुळव्याधीचा त्रास उद्भवला. काढ्याच्या अतिसेवनाने हा आजार उद्भवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.- काढा सेवनकरणारा युवक, अमरावती
मालेगाव कोरोना काढ्यामुळे अनेकांना मुळव्याध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 5:00 AM
उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या 'मालेगाव पॅटर्न' काढयाचे सेवन करावे, असे आवाहन समाजातील अनेक जबाबदार घटकांनी सामान्य जनतेला केले. अमरावती महानगरात आणि ग्रामीण भागात मोक्क्याच्या ठिकाणी स्वत:च्या छायाचित्रांसकटचे विशाल बॅनर्सही त्यासाठी अनेकांनी लावले. व्हॉटस अॅपवर तर मालेगाव काढ्याच्या सामग्रीची आणि ती तयार करण्याच्या विधीची धूम अनेकांनी अनुभवली आहे.
ठळक मुद्देअधिकृतता काय ? : काढा ही आयुर्वेदिक औषधी, अतिसेवनाने अपाय होणारच !