इंटरनेटवर होतो निकाल जाहीर : अवैध व्यावसायिकांसमोर पोलीसही हतबलवैभव बाबरेकर अमरावतीआधुनिक तंत्रज्ञानामुळे एकीकडे विकासाला चालना मिळते, हे खरे असले तरी याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गुन्हेगारीच्या कार्यकक्षा विस्तारित असल्याचे वास्तव आहे. काही दिवसांपासून अमरावतीत बिनबोभाट सुरू असलेला ‘वरळी-मटक्या’चा व्यवसायदेखील आता ‘हायटेक’ झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्हेगारांकडून शिताफीने होणाऱ्या वापरामुळे पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे. वरळी-मटक्याच्या इंटरनेटवर जाहीर होणाऱ्या निकालांची आकडेवारी पाहता किती मोठ्या प्रमाणात सामान्य लोकही या ‘वरळी-मटक्या’त सहभागी आहेत, हे लक्षात येते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगण्याला वेग आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विद्युत बिले, टेलिफोन बिले, वस्तुंची खरेदी-विक्री केली जाऊ लागली. त्यासोबत गुन्हेगारी जगतानेही तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली. सायबर क्राईम फोफावण्याचे हे एकमेव कारण आहे. सायबर क्राईमवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान सद्यस्थितीत पोलिसांपुढे आहे. गेल्या काही वर्षांत सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक नागरिकांच्या एटीएममधून आॅनलाईन पध्दतीने पैसे काढून त्यांची फसवणूक केल्याच्या घटना घडतात. अनेकांना लॉटरीचे आमिष दाखवून आॅनलाईन पैसे घेऊन फसवणूक केली जाते. वारंवार अशी प्रकरणे उघडकीस येतात. अमरावती शहरातही आता ‘हायटेक’ गुन्हेगारी फोफावत असल्याचे दिसते. इंटरनेटच्या माध्यमातून वैध व अवैध कामे सुरु झाली आहेत. शहरात वरळी-मटका व्यवसायाचे प्रस्थ वाढले आहे. वरळी-मटका लावणाऱ्यांना व्यवसायिकांकडून आकड्यांच्या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाते. त्या चिठ्ठीवरील आकडा उघडल्यास त्यांना दहा ते १ हजार पटीने अधिक पैसे देण्यात येतात. म्हणजे एका आकड्यावर १ रुपयास दहा रुपये मिळतात. जोडी लावल्यास १ रुपयांचे १०० रुपये मिळतात. सलग तीन आकडे म्हणजेच परेल लागल्यास एका रुपयांवर १ हजार रुपये मिळतात. काही रूढ संकेतांवर वरळी-मटक्याची परंपरा सुरु आहे. वरली-मटक्याचा व्यवसाय कायद्याच्या चाकोरीत बसत नाही. एकीकडे शहरात दररोज वरळी-मटका व्यावसायिकांवर कारवाई होत असतानाही हा व्यवसाय सुरळीत सुरुच आहे. आता हा व्यवसाय हायटेक झाल्याने यात सहभागी लोकांना आकड्यांचे निकाल पाहण्याकरिता निश्चित ठिकाणी जाण्याची गरज राहिलेली नाही. उलट आॅनलाईन पद्धतीने अगदी सोप्या रितीने हे निकाल त्यांना पाहता येतात. शहर पोलीस विविध ठिकाणी धाडी टाकून वरळी-मटका व्यावसायिकांवर कारवाई करतात. मात्र, इंटरनेटच्या वेबसाईटवर जाहीर होणारे निकाल आणि त्यातून होणारी लाखोंची उलाढाल थांबविण्याचे आव्हान अमरावती पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)इंटरनेटचे जाळे जगभरात पसरले आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राचा व्यापही वाढला आहे. गुन्हेगार वेबसाईटच्या माध्यमातून अवैध व्यवसाय बिनबोभाटपणे करु शकतात. त्यांच्याबद्दल तक्रार आल्यास नक्कीच कारवाई करू. - रवी राठोड, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.
‘हायटेक’ वरली-मटक्याचे जाळे
By admin | Published: June 14, 2015 12:18 AM