अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:21 PM2018-03-01T12:21:50+5:302018-03-01T12:21:58+5:30
धूडवळीची सर्वत्र वाट पाहिली जात असताना येवदा तालुक्यातील पिंपळोद येथे मात्र गेल्या ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन होत नाही
अनंत बोबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: धूडवळीची सर्वत्र वाट पाहिली जात असताना येवदा तालुक्यातील पिंपळोद येथे मात्र गेल्या ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन होत नाही, तर येथील ग्रामस्थ परमहंस परशराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, शुक्रवारी होत असलेल्या कार्यक्रमांच्या आयोजनात गुंतले आहेत.
पिंपळोद या गावाला संत परमहंस परशराम महाराज यांचा पावनस्पर्श लाभला आहे. महाराजांची ख्याती कर्णोपकर्णी सर्वदूर पसरल्याने त्यांच्या भक्तपरिवारात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग होता. १९५१ मधील वैशाख पौर्णिमेला महाराज वैकुंठवासी झाले. तेव्हापासून या गावात होळी पेटत नाही, रंगांची उधळण होत नाही. मात्र, यानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबविले जाते. सर्व गाव स्वच्छ करून केरकचरा नाहीसा केला जातो. होळी न पेटविल्यामुळे झाडांची कत्तल होत नाही तसेच रंगांची उधळण होत नसल्यामुळे शारीरिक हानीसुद्धा होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचा संदेश हे गाव देत आहे.
गावातील परशरामनगर येथे यानिमित्त गुरुवार, १ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता हभप उद्धवराव गाडेकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजता दिंड्या-पताक्यांच्या हजेरीत महाराजांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता हभप दासगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. यानिमित्त परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, होळीचा सण साजरा न करता परशराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यासाठी गावातील आबालवृद्ध झटत आहेत.