होम आयसोलेशन रुग्णांच्या हातावर शिक्का, घरावर बोर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:48+5:302021-02-25T04:14:48+5:30
अमरावती : होम आयसोलेशनची सुविधा घेतल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांवर महापालिका आयुक्तांनी आता चांगलेच निर्बंध आणले आहे. या रुग्णांच्या ...
अमरावती : होम आयसोलेशनची सुविधा घेतल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांवर महापालिका आयुक्तांनी आता चांगलेच निर्बंध आणले आहे. या रुग्णांच्या हातावर आता शिक्के मारण्यात येणार आहे. रुग्णांची विचारणा झालीच पाहिजे. याशिवाय संबंधित रुग्णाच्या घरासमोर बोर्ड लागलाच पाहिजे, अशी तंबी आयुक्त प्रशांत रोडे यांनी यंत्रणेला दिली. या रुग्णाच्या घरी आशा वर्करच्या नियमित भेटी झाल्याच पाहिजे व पथकांनी रॅन्डमली व्हिजिट करण्याचे निर्देशही त्यांनी बुधवारी दिले.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना होम आयसोलेशन रुग्णांकडून कुठलीही हयगय खपवून घेणार नाही. यासंर्दभात त्यांनी संबंधित यंत्रणेला खडेबोल सुनावले. यासाठी स्थायी समितीच्या सभागृहात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला व या कक्षातून होम आयसोलेशन रुग्णांशी दिवसातून दोनवेळा संवाद साधला जात आहे. होम आयसोलेशमधील रुग्ण बाहेर दिसल्यास २५ हजारांचा दंड मालमत्ता करात जोडल्या जाऊन वसूल केले जाणार आहे. अशा रुग्णांवर फौजदारी कारवाई करावी. याशिवाय झोनच्या पथकांद्वारा अचानक भेटी देण्याचे निर्देश त्यांनी बुधवारी दिले.
आयुक्तांद्वारा रोज सकाळी व सायंकाळी आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आहे. याचाही पाठपुरावा आयुक्तांद्वारा घेतला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याला इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील देण्यात आलेले आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आली असून शहरात सहा ठिकाणी सध्या स्वॅब सेटंर सुरू केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
बॉक्स
आता पोलिसांच्या मदतीला पथक
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने शहरातील चौकाचौकांत पोलिसांनी सिलिंग पाईंटस लावले आहे. या प्रत्येक पाॅईंटवर पोलीस पथकासोबत आता संबंधित झोनमधील महापालिकेचे पथकही सोबतीला राहतील. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना २३ फेब्रुवारीला आदेश देण्यात आलेले आहे.
बॉक्स
सीटी स्कॅन सेंटर, दवाखान्यांची तपासणी
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अनेक डॉक्टर्सद्वारा रुग्णांजवळ कोरोना चाचणी अहवाल नसल्यास सीटी स्कॅनचा अहवाल मागत आहे. काही ठिकाणी अधिक पैसे उकळल्याच्या तक्रारी आल्याने शहरातील सर्व सेंटर तपासणीचे आदेश आयुक्तांनी एमओएन विशाल काळे यांना दिले. सोबतच आता दवाखान्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
बॉक्स
सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या सुरू
ज्या व्यक्तींचा अधिक व्यक्तींशी संपर्क येतो, अशा सुपरस्प्रेडर व्यक्तींच्या अधिकाधिक चाचण्या करण्याचे निर्देश आयक्तांनी दिले होते. त्याला प्रतिसाद देत या सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या चाचण्या सुरू झाल्या आहे. यासाठी स्वतंत्र स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरात सद्यस्थितीत सहा ठिकाणी स्वॅब सेंटर सुरू आहे. प्रसंगी सेंटर वाढविण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
बॉक्स
शहरच कंटेनमेंट, आता उपाययोजनांवर भर
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता अमरावती शहर कंटेनमेंट झोन जाहीर केल्याने शहरातील हॉटस्पॉटमध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्यात येणार नाही. मात्र, संपूर्ण शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. पथकांद्वारा नियमित कारवाया सुरू असल्याचे आयुक्त रोडे म्हणाले.