धामणगावात वाढत्या संक्रमणाशी आशा, आरोग्य विभागाची एकाकी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:17+5:302021-06-01T04:10:17+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५८ गावे कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. साठपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५८ गावे कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. साठपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा अडीच हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोना तपासणी व अटकावासाठी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांनी पुढे येण्याची गरज असताना, केवळ आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग एकाकी झुंज देत आहेत. त्यामुळे तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाला निर्बंध कसा बसणार, असा सवाल निर्माण होत आहे.
धामणगाव तालुक्यात दीड वर्षांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर शहरी भागात सर्वाधिक ही आकडेवारी वाढली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रत्येक गावात चाळीस ते पन्नास कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. नायगावसारख्या लहानशा गावात तब्बल ५९ रुग्ण गत आठवड्यात आढळले आहेत. चाचणी शक्य तेवढ्या लवकर झाली, तर रुग्ण बरा होऊ शकतो, हे स्पष्ट असताना अनेक जण ही चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशावेळी गावातील लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी ही राष्ट्रीय आपत्ती समजून त्याच्या निवारणासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. मात्र, या तालुक्याचे चित्र वेगळे आहे. आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहे. गावात कोरोना रुग्ण आढळल्यास आशा स्वयंसेविकेवर जबाबदारी सोपविली जाते. मग, इतर प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी करतात तरी काय, असा सवाल निर्माण होत आहे.
१२ तासांत होऊ शकते एका गावाची चाचणी
गावपातळीवर असलेल्या पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषिसहायक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, खासगी शाळांतील शिक्षक, वीज कर्मचारी, बीट जमादार यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांचे प्रत्येक गावात स्नेहाचे संबंध आहेत. गावातील व्यक्तीही या कर्मचाऱ्यांना सन्मान देतात. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या गावात कोरोना चाचणी शिबिर आयोजित केले, त्या शिबिरात चाचणी करण्यास ग्रामस्थांना या व्यक्तींनी प्रवृत्त केले, तर बारा तासांच्या एका गावाची पूर्ण तपासणी होऊ शकते. मात्र, आरोग्य कर्मचारी व काही मोजकेच पदाधिकारी कार्यरत दिसतात. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची आकडेवारी पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.