-------------------------------------------------------------------------------
वन अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा, अधिकाऱ्यांची अरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे. आम्ही महिला सशक्तीकरण, महिलांचे आरोग्य, त्यांचे प्रश्न यावर खूप बोलतो.,चर्चा करतो. शासकीय कार्यालयात त्यातही दुर्गम भागात, लहान शहरात नोकरी करताना महिला प्रचंड अडचणी असतात. खरे तर पुरुषांनी मानसिकता बदलविण्याकरिता स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपण घरातील सुनांना आपली मुलगी म्हणून मान दिला तर बिघडते कुठे? पण तिला बाई- बेटा म्हणताना आमचा "ईगो हर्ट" होतो. हीच गत कार्यालयात काम करणाऱ्या पुरुषांची असते. प्रत्येकाला जन्म हा एका स्त्रीनेच दिला आहे. आमच्या ही घरात बहिणी आहेत.,अनेक महिलांच्या संसारातून आम्ही घडतं असतो., हेच पुरुष विसरतो आणि अशा घटना घडतात.
दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूची दुःखद बातमी संपत नाही तोच भूमिअभिलेख कार्यालय, चांदूर बाजार येथील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याची तक्रार दाखल झाली आहे. अशा तक्रारींची तातडीने पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावशक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त , पोलीस अधीक्षक यांची बैठक घेऊन अशा घटनांकडे डोळसपणे पाहण्याचे आदेश द्यावेत.
- अनंत गुढे, माजी खासदार, अमरावती