अमरावती : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन ऑफलाईन होत असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे २९ डिसेंबर रोजी होऊ घातलेली सिनेट सभा ऑनलाईन का, असा सवाल सिनेट सदस्य मनीष गवई यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्र लिहून एसओपीचे पालन करीत सिनेट सभा ऑफलाईन घेण्याबाबत परवानगीची मागणी करण्यात आली.
विद्यापीठाची द्धितीय सिनेट सभा २९ डिसेंबर रोजी होत असून, सदस्यांना सभेचे निमंत्रणदेखील मिळाले आहे. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता एसओपीचे पालन करून ऑफलाईन सिनेट सभा घेण्यास काहीही हरकत नाही, असे मनीष गवई यांचे म्हणने आहे. विधी मंडळाचे अधिवेशन ऑफलाईन होऊ शकते, तर सिनेट सभा घेणे गैर नाही, असे गवईंनी पत्रात नमूद केले आहे. सिनेट सभा ऑफलाईन होणे गरजेचे आहे. यापूर्वी विद्यापीठातील अपहार, गैरव्यवहार, अनियमितता अशा विविध प्रकरणांचे चौकशी अहवाल, कारवाई अप्राप्त आहे. त्यामुळे सिनेट सभा ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी मनीष गवई यांनी केली आहे.