लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका तरुणीला आरोपी युवकाने लग्नाची मागणी घातली. तिच्या सोयरिकीच्या ठिकाणी प्रेमसंबंधाची द्वाही देत होणारे लग्न मोडले आणि त्यानंतर अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मोहम्मद अबरारउल हक (२८, रा. पॅराडाईज कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात एका तरुणीने शनिवारी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार, ती अबरारला २०११ पासून ओळखते. ओळखीची व्यक्ती म्हणून त्याच्याशी ती बोलत होती. मात्र, त्याचा गैरफायदा घेत तिच्या घराभोवती त्याने चकरा घालण्यास सुरुवात केली. ती घराबाहेर पडली, की माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे तिला अडवून, हात पकडून तो म्हणायचा. मुलीने हा प्रकार भावाला सांगितला. त्याने युवकाला समज दिल्यानंतर अबरार २०१८ पर्यंत तिच्या वाटेला गेला नाही. मात्र, २०१८ मध्ये ती तरुणी बंगळुरुला असताना, अनोळखी क्रमांकावरून त्याने तिच्याशी संपर्क साधला. तुला अजून विसरलो नाही. तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर मी स्वत:चे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी देऊन त्याने तिला बोलण्यास बाध्य केले.
फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी तिचे लग्न ठरले, तेथे फोन करून कथित प्रेमसंबंधाची माहिती दिली. याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरारउल हक याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ३४१, ५०६ अन्वये नोंदविला आहे.