बाहेरच्या पानासाठी फोटो पी १२ मेळघाट
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा वनपरिक्षेत्रात मासेमारी करणाऱ्या स्थानिकांना वनकर्मचाऱ्यांनी पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. मेळघाट क्षेत्रात अवैध मासेमारीमुळे काही लोकांना आपला जिव गमवावा लागला, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिसंरक्षित दक्षिण डोलार नियत क्षेत्रातील वनखंड क्रमांक ९०४ मध्ये ही कारवाई करण्यात आली.
कैलास शंकर भिलावेकर, हरिराम मंगल सावलकर, काल्या बाबू भिलावेकर (सर्व रा. मोगर्दा, ता. धारणी) अशी आरोपींची नावे आहेत. अतिसंरक्षित दक्षिण डोलार नियत क्षेत्रातील वनखंड क्रमांक ९०४ या अतिसंरक्षित जंगलात प्रवेश करून मासेमारी करताना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मासेमारीसाठीचे जाळे व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. आरोपींना धारणी न्यायालयात सादर केले आहे.
बॉक्स
मासेमारी आणि जंगलातच मुक्काम
मेळघाटातील आदिवासींचे सर्वात आवडते खाद्य मासे आणि छंद मासेमारी आहे. त्यामुळे तलाव, नदी, नाल्यांमध्ये मासेमारी केली जाते. सदर प्रकरणात अटकेतील आरोपी रात्रमुक्कामाच्या तयारीने गाभा क्षेत्रात मासेमारीकरिता गेले असल्याचे तपासात पुढे आले. वनपरिक्षेत्र अधिकारी हीरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल एम.जी. हेकडे, बोरीपाटी वर्तुळ वनरक्षक हनुमंत काकडे, रमेश बेठेकर पुढील तपास करीत आहेत.
बॉक्स
गाभा क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश टाळा
आदिवासींनी व्याघ्र प्रकल्पात अशाप्रकारे अपप्रवेश करणे, मासेमारी, शिकार किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करण्याचे आवाहन व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने करण्यात आले. जंगली श्वापदांपासुन अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी हीरालाल चौधरी यांनी दिला आहे.