डझनभर गावांत अवैध देशी दारू विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:21 AM2021-02-06T04:21:55+5:302021-02-06T04:21:55+5:30
खल्लार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खल्लार व कोकर्डा या दोन गावांमध्ये शासन मान्यताप्राप्त देशी दारूची दुकाने आहेत. ...
खल्लार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खल्लार व कोकर्डा या दोन गावांमध्ये शासन मान्यताप्राप्त देशी दारूची दुकाने आहेत. ही दोन गावे वगळता अन्य ठिकाणी अवैध देशी दारूची तस्करी करून सर्रास विक्री सुरू आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावाकडून दुचाकी तसेच चारचाकीने अवैध देशी दारूची तस्करी खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये होत आहे. सद्यस्थितीत कसबेगव्हाण, साखरी, चिपर्डा, बेलोरा, रामगाव, कोळंबी, नरदोडळा, कान्होली, उपराई, मार्कंडा, वडुरा, नाचोना, कमालपुर आदी गावांमध्ये दारूची अवैध विक्री केली जात आहे.
देशी दारू विनासायास उपलब्ध होत असल्याने अनेक जण त्याच्या आहारी जात असून, परिसरातील सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवैध देशी दारू विक्री व तस्करी जोमात सुरू असली तरी राज्य उत्पादन शुल्क विभागासह खल्लार पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. खल्लार थांब्याच्या चौफुलीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असताना, दारूच्या पेट्या घेऊन जाणारी वाहने येथील पोलिसांना दिसत नाहीत का, असा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.