गुन्हांच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस पथक
By admin | Published: June 14, 2015 12:28 AM2015-06-14T00:28:20+5:302015-06-14T00:28:20+5:30
शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारीच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
१२ इन्व्हेस्टिगेशन पथके : अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण
अमरावती : शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारीच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. या उद्देशाने आता स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांमध्ये १२ इन्व्हेस्टिगेशन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
शनिवारपासून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून १ जुलैपासून प्रत्येक ठाण्यामधील गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास पथके करणार आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनी संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये स्वंतत्र तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील दहा पोलीस ठाण्यांतर्गत स्वतंत्र तपास पथक तयार करण्यास सुरुवात झाली आहे. गाडगेनगर व बडनेरा पोलीस ठाणे ए दर्जाचे स्थान देण्यात आले असून तेथे प्रत्येकी दोन पथके सज्ज राहणार आहेत. अन्य आठ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक सज्ज राहणार आहे.
या सर्व ठाण्यात विधी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच एकूण ७६ पोलीस कर्मचारी पथकात सहभागी राहणार आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
तपासकार्यात कोणताही त्रुटी आढळून येऊ नये. याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. सखोल चौकशीअंती न्यायालयात गेलेले प्रकरणात आरोपीला शिक्षा व्हावी, या उद्देशान ही पथके तयार करण्यात आली आहे. शहरात मंत्री दौरे, बंदोबस्त व वेळेवर येणाऱ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज असते. त्यामुळे गंभीर गुन्हाच्या तपासात पोलीस यंत्रणा वेळ देऊ शकत नाहीत. याचा परिणाम आरोपीच्या शिक्षेवर होतो. शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने सखोल तपास होणे आवश्यक असल्यामुळे ही पथके तयार करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण होणार असल्याचा विश्वास उपायुक्त घार्गे यांनी व्यक्त केला आहे.