साथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:23+5:30
गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आणि साथरोग पसरणार नाही, याकरिता पाण्याने निर्माण झालेले डबके बुजवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदी बु : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिंदी बु. ग्रामपंचायतीतील वॉर्ड ४ अंतर्गत पोही गावात टायफॉईड, डेंग्यू रुग्णाची नोंद झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी भेट देत गावाची संपूर्ण पाहणी केली.
गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आणि साथरोग पसरणार नाही, याकरिता पाण्याने निर्माण झालेले डबके बुजवावे. खताचे ढिगारे उचलावे. गावामध्ये त्वरित डासअळी प्रतिबंधक धूर फवारणी करावी, असे निर्देश ग्रामसचिवांना पत्राद्वारे दिले.
पोही गावातील साथरोगाची व्याप्ती ही या छोटेखानी गावाच्या दृष्टीने चिंतेची आहे. येथे टायफॉईड, डेंग्यू आणि विषमज्वर या आजारांची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, डॉ. मुन्द्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मालखेडे, सहायक गटविकास अधिकारी खानंदे, हरम येथील ग्रामविकास अधिकारी योगेश्वर उमक गावात दाखल झाले. ग्रामपंचायतीला गावाच्या स्वच्छतेकरिता त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश सहायक गटविकास अधिकाºयांनी दिले.