५५ लाखांच्या गांजाची माहिती बडनेरातून ‘लीक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:01 PM2019-06-27T23:01:36+5:302019-06-27T23:02:36+5:30
नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाले.
चेतन घोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाले.
लोणी पोलिसांनी नागपूर-मुंबई हायवेवर २५ जूनच्या रात्री केलेल्या नाकाबंदीदरम्यान ट्रक क्रमांक एच.आर. ४६ सी १६५७ थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता, चालक व एक साथीदार पसार झाले. पण, त्या ट्रकातील एका इसमास पोलिसांनी अटक करून ट्रकची झडती घेतली. यावेळी ५५ लाखांचा १० टन गांजा आढळून आला. तथापि, हा ट्रक पकडला जाण्याच्या मागे वेगळेच कारण आता पुढे आले आहे.
सूत्रांनुसार, नागपूर-मुंबई हायवेवरून हा ट्रक बडनेरा शहरापासून जात असताना काही इसमांनी तो शेतात वळवून चालक व क्लीनरला बांधून ठेवले. या ट्रकमधल्या केळीच्या घळाखाली गांजाचे पोते भरून अन्य चालक व इतर साथीदारांच्या मदतीने नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आला होता.
दरम्यान, आधीच्या चालकाने कशीबशी सुटका करून मालकाशी संपर्क करून ट्रक लंपास करण्यात आल्याची माहिती दिली. ट्रकमालकाने अमरावती ग्रामीण नियंत्रण कक्षाला माहिती देऊन बडनेरा हद्दीतून ट्रक पळविला गेल्याची माहिती दिली. त्यानंतर अमरावती ग्रामीण हद्दीतील लोणी पोलीस स्टेशन व अकोला जिल्ह्यातील माना-कुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हायवे रोडवर नाकाबंदी करण्यात आली. हा ट्रक साई रिसॉर्टजवळ अडविण्यात आला. या मोहिमेस ट्रकची जीपीएस यंत्रणा महत्त्वाची दुवा ठरली. तपासणीदरम्यान दोन आरोपी पोलिसांना चकमा देवून पसार झाले. मात्र, एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. घटनाक्रमाबाबत काहीच माहीत नसल्याचे त्याने सांगितले. त्या आरोपीला लोणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या घटनाक्रमात एक हजार किलो गांजा बडनेरातून रवाना करण्यात आल्याने येथे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले.
मध्यस्थी करणारा अधिकारी कोण ?
५५ लाखांचा गांजा पकडल्यावर पोलीस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी देवाण-घेवाण करण्याचा मोठा प्रयत्न केला. मध्यस्थी करणारा हा अधिकारी कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.
गांजाच्या कारवाईत श्रेयाचे राजकारण
एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेल्यावर अमरावती ग्रामीण पोलीस दलातील काही घटकांमध्ये श्रेयाचे राजकारण चालले होते. कारवाई आम्हीच केली असे एकमेकांना ठणकावून सांगितले जात होते.