(असाइनमेंट)
अमरावती : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच केंद्रांवर गर्दी कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेने सर्वांचे गैरसमज दूर झाले व आता लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आवरेनासी झाली आहे. जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने चार-चार दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. शहरात पहाटे चार वाजेपासून केंद्रांवर रांगा लागत आहेत, दिवसभर रांगेत राहून टोकन भेटत नसल्याने शहरातले नागरिक लस घ्यायला ग्रामीण भागात धाव घेत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या सहा केंद्रांवर लसीकरण झाले व आता १३६ केंद्रे आहेत. सुरुवातीला पहिल्या दोन टप्प्यांतीलही लसीकरण कमी व्हायचे. लसीकरणाची एक सुप्त भीती वाटत असल्याने एका केंद्रांवर दिवसभरात १०० डोज होत नव्हते, टार्गेटदेखील पूर्ण होत नसल्याने आरोग्य विभागाद्वारे जनजागृती करण्यात आली व लसीकरणासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठी गर्दी केंद्रांवर व्हायला लागली. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली व प्रत्येक केंद्रावर पहाटे चार ते पाच वाजेपासून रांगा सुरू झाल्या, त्या अजूनही रोज लागताहेत.
जिल्ह्यातील लसीकरणात खरा खोडा हा पुरवठ्याचा आहे. चार लाख डोजची मागणी असताना १०, २० हजार डोज प्राप्त होत असल्याने जिल्ह्यातील अर्धेअधिक केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर ओढवली आहे.
बॉक्स
लसीकरणाविषयी असे होते गैरसमज
लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे गैरसमज होते. मासिक काळात लस घेता येत नाही. मात्र, याविषयी तज्ज्ञांनी सातत्याने स्पष्ट केल्यामुळे आता सर्व महिला लसीकरणाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात आदिवासीबहुल मेळघाटात सर्वाधिक गैरसमज होते. याविषयी तेथील अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत मेळघाटातील चित्र आता बदलविले आहे. याशिवाय लसीकरणामुळे वंध्यत्व, नपुंसकता आदी गैरसमज होते. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारा त्या-त्या भागातील मान्यवरांशी संवाद साधला व त्यानंतर आता कुठे या भागातील लसीकरणाचा टक्का वाढला आहे.
कोट
गावकऱ्यांचा समज, संभ्रम दूर
कोट
लसीकरणाविषयी मनात भीती होती, लस घेतल्यानंतर ताप येतो, आजारी पडतो, असे ऐकले होते. मात्र, परिवारातील काहींनी लस घेतल्यानंतर हे गैरसमज आता दूर झाले आहेत. लस घेतल्याने कुठलाच त्रास झालेला नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी लस घ्यावी, असा आग्रह धरला व लसीकरण केले आहे.
रामदासराव बोंडे, अमरावती
कोट
कोरोना लस घेतल्यावर काही दिवस काम करता येणार नाही असे वाटत होते. काहींना तापदेखील आला होता. मात्र, कोरोनामुळे गावात अनेकांचा मृत्यू झाला आहे. काहींची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्व विचार डोक्यातून काढून पहिल्यांदा लस घेतली. कुठलाही त्रास झाला नाही. लस घेतल्याने कुठलाही त्रास नाही.
भूषण देशमुख, चांदूर बाजार
कोट
सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. आरोग्य विभागाद्वारा सातत्याने जनजागृती करण्यात आल्यानंतर प्रतिसाद वाढला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोहीम मंदावते.
डॉ. दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी
पाइंटर
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
प्रकार पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १९,१७५ १२,९११
फ्रंटलाइन वर्कर २९,२७९ १२,०६७
१८ ते ४४ वयोगट १८,३५३ ०७
४५ ते ५९ वयोगट १,३१,५५५ २७५४१
६० वर्षांवरील १,४६,३५७ ५३,७९६