अमरावती - नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांचे निकष ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा पुरस्कृत या शिबिरात गुणांच्या कसोटीतून निवड झालेल्या अकरावीतील विद्यार्थ्या$ंना नामवंत अशा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञांचे व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रायोगिक कृतीद्वारे मार्गदर्शन लाभणार आहे, शिवाय थेट संवाददेखील साधता येईल. आयआयटी, आयआयएसईआर, आयसीटी, सीसीएमबी, एचबीएससीई अशा राष्ट्रीय संस्थांमधील विख्यात शास्त्रज्ञ मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पद्मभूषण विजय भटकर, नरसिम्हन (बीएसआय), बी.एन. जगताप (आयआयटी, मुंबई), डॉ. दलाई (आयआयटी, कानपूर), रमेश अग्रवाल (सीसीएमबी, हैदराबाद), संजीव झाडे (आयआयएसईआर, कोलकाता), अशोक रूपनेर (आयआयएसईआर, पुणे), शशांक म्हस्के, (इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई), हरिता रावळ (डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई), विकास गुप्ता (डीएव्ही महाविद्यालय, अमृतसर) यांचा सहभाग राहणार आहे. शिबिरात निवड होण्यासाठी आॅनलाइन पद्धतीने १ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याकरिता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर किंवा आयोजन सचिव दिनेश खेडकर यांच्या इमेलवर विद्यार्थ्यांना संपर्क करावयाचा आहे, असे प्राचार्य विजय ठाकरे यांनी कळविले आहे.
विद्यार्थी निवडीची पात्रता निवासी शिबिरात सहभागाकरिता अर्ज करणारा विद्यार्थी हा अकरावीत शिकणारा असावा. संस्थेने त्याची शिफारस केलेली असावी. दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळात ९३.६० टक्क््यांहून अधिक, सीबीएसईमध्ये ९५ आणि आयसीएसई मध्ये ९६.८० टक्के गुण असावे. यापूर्वी अशाप्रकारे इंटर्नशिप कॅम्प कुठेही इतरत्र केलेला नसावा.
इन्स्पायर कॅम्पच्या माध्यमातून गुणवत्ताधारकांना ज्ञानाची भूक भागविण्याची ही संधी विदर्भातील केंद्रस्थानी असलेल्या महाविद्यालयास प्राप्त झाली आहे. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी शिबिरात भविष्यातील कारकिदीर्तील सर्वोच्च शिखराची संकल्पना दृढ करण्याच्या व त्यासाठीची वाट चोखंदळायच्या निश्चयासह दाखल व्हावे.- विजय ठाकरे, प्राचार्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशिष्ट मार्गाने प्रेरित करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग विशिष्ट पद्धतीने रचनाबद्ध केलेल्या शिबिराचे आयोजन करीत आहे. १५० विद्यार्थ्यांना या माध्यमातून संधी मिळणार असून, जागतिक पातळीचे शास्त्रज्ञ निर्माण होण्याची मुहूर्तमेढ या शिबिरात रोवली जावी, अशी अपेक्षा आहे. - दिनेश खेडकर, आयोजन सचिव