वरूड मध्ये सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:03 PM2018-02-26T22:03:21+5:302018-02-26T22:03:21+5:30

The irrigation question on the anvil | वरूड मध्ये सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

वरूड मध्ये सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

Next
ठळक मुद्देदप्तरदिरंगाई : २३० कोटींचा प्रकल्प गेला ११०० कोटींवर; वर्धा डायव्हर्शन, पंढरी प्रकल्प रखडले

संजय खासबागे ।
आॅनलाईन लोकमत
वरुड : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुसरीकडे ड्रायझोनमुळे जमिनीखालील उपशावर बंदी आहे, तर तब्बल १० वर्षांपासून सिंचन प्रकल्प रडतखडत आहे. २३० कोटींचा वर्धा डायव्हर्शन प्रकल्प ११०० कोटींवर गेला आहे.
तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, २३ हजार हेक्टरमध्ये लागवड आहे. जिल्ह्यातील सिंचनाखाली असणारे मोठे क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. संत्राफळे टिकविण्याकरिता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून सुपर एक्सप्रेस वर्धा डायव्हर्शन कालव्याला २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. कामाला प्रारंभ होताना त्याची किंमत २३० कोटी होती. मध्यंतरी या प्रकल्पाला राजकीय ग्रहण लागले, तर आता शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धा डायव्हर्शनसह तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. १० वर्षांत हा प्रकल्प २३० कोटींवरून ११०० कोटीवर पोहोचला तरी काम अपूर्णच आहे. अजूनही ३० टक्के काम शिल्लक आहे.
वरुड तालुक्यातील भूजल पातळी अतिउपशामुळे १२०० फुटांवर गेली होती. तालुक्यातील नद्या बारमाही वाहत्या करण्याकरिता तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी शासनदरबारी वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाचा प्रश्न रेटून धरला. सन २००५ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाद्वारे १२ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उजवा कालवा १८.५ किमी लांबीचा आहे.
वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनॉल सातपुड्याच्या पायथ्याशी असून, याद्वारे पुसला ते जरूडपर्यंत सर्व नद्या बारमाही वाहत्या ठेवल्या जाणार आहे, तर डावा कालवा ३.१८ किमी लांबीचा आहे. यामध्ये उराड, सावंगी, चांदस,वाठोडा हा परिसर येणार आहे. परंतु, आता केवळ धनोडी मालखेडपर्यंतच कॅनॉल राहणार असल्याचे सांगण्यात येते. २१० हेक्टर जमिनीवर हा डायव्हर्शन साकारला जात असून, यामध्ये वनविभाग, खासगी आणि सरकारी मालकीच्या जमिनीचा समावेश आहे. या प्रकल्पाला जोड आणि जलसंचय राहावा म्हणून हर्षवर्धन देशमुख यांनी पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी, झटामझिरी, भेंमडी, पवनी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. गत १० वर्षांपासून या प्रकल्पाचे तुटपुंज्या निधीअभावी काम बंद असल्याचे सांगण्यात येते. आता त्याची किंमत ११०० कोटी झाल्याचे सहायक कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी सांगितले. अधिग्रहित केलेल्या बुडित क्षेत्रातील जमिनीचा मोबदला देऊन पाटबंधारे विभाग मोकळे झाले. तरीसुद्धा प्रकल्पाचे काम का रखडले, हा चिंतेचा विषय आहे.
निधी मिळाला; काम ठप्प
आ. अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून वरूड तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाकरिता ४८८.५२ कोटी, पाकनदी लघुपाटबंधारे प्रकल्पाकरिता ३५.३८ कोटी, झटामझिरी प्रकल्पाकरिता ३.६५ कोटी, भेमंडी लघू प्रकल्पाकरिता २४.९१ कोटी असे ५५२ कोटी ४६ लाख रुपये जलसंपदा विभागाकडून मिळविल्याचे खुद्द संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. तरीसुद्धा सदर प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे.
प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा
वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सपे्रेस कालवा आणि पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू होऊन दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या. प्रत्येकवेळी हाच मुद्दा होता. तरीही प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता सावंग यांनी सांगितले, प्रकल्पाची किंमत ११०० कोटी रुपये झाली आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले. ३० टक्के काम होत असून, कामाचे डिझाइन आलेले नाही.
हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर!
ुप्रकल्पाकरिता जमिनी देऊन काही भूमिहीन, तर काही प्रकल्पग्रस्त झाले. आता बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीतून उत्पादन काढता येत नाही. प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मुलांना नोकऱ्यासुद्धा दिल्या नाही.

गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी. कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही डावा आणि उजवा कालवा अपूर्ण अवस्थेत आहे. त्याविरोधात पुसला परिसरातील शेतकºयांसह प्रकल्पातच आमरण उपोषणाला बसणार आहे.
- विजय श्रीराव, भाजप नेते

Web Title: The irrigation question on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.