‘इर्विन’ रुग्णालयच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:43+5:302021-09-13T04:12:43+5:30
अमरावती : शहरातील अस्वच्छता, वातावरणातील बदल व सततचा पडणारा पाऊस यांमुळे सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये लहान ...
अमरावती : शहरातील अस्वच्छता, वातावरणातील बदल व सततचा पडणारा पाऊस यांमुळे सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये लहान मुलांना व्हायरल तापाची लक्षणे वाढली आहे. त्यामुळे इर्विन रुग्णालयात आजारी पडल्याचे चित्र आहे. रुग्ण अधिक आणि खाटा कमी अशी विदारक स्थिती आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
बाह्यरुण विभागात रुग्णावर उपचारासाठीची वेळ सकाळी ८ ते २ असली तरी नियमित डाॅक्टर व स्टाफ गैरहजर असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. आकस्मिक वाॅर्डात एकच डाॅक्टर कर्तव्यावर असल्याने कामाचा ताण वाढत आहे. मनुष्यबळ तोकडे असल्याचा प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढीव दिली जात नाही. २७५ बेड व ५ आयसीयू बेड हे तुटपुंजे असल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तुटपुंज्या सोई असल्याने नाइलाजास्तव बाहेरच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे लागत आहे. मायक्रो सोनोग्राफी, एमआरआय मशीन उपलब्ध नाही. लोकसंख्येच्या तुुुलनेत फक्त ३० टक्के स्टाफ आहे.
बॉक्स
डॉक्टरांचा अनुशेष केव्हा भरणार?
रुग्णालयात सेवा देण्यासाठी फक्त ८६ नर्सेस आहेत. डाॅक्टरांची संख्या तोकडी आहे. वाॅर्डातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई होत नसल्याने प्रत्येक वाॅर्डात अस्वच्छता पसरली आहे. आरएमओ डॉ. प्रमोद निरवणे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा त्यांनी केली. शासनाने त्वरित स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
-----------------
वंचित बहुजन आघाडीची धडक
ईर्विनमध्ये बेडअभावी रुग्णांची फरफट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी डॉक्टर, कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किरण गुडधे, सुरेश तायडे यांनी प्रत्यक्ष वाॅर्डा-वाॅर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली, सोई-सुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.