लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील जावरा रेतीघाटात आयपीएस अधिकाऱ्यांनी धाड टाकून रेतीचा अवैधरीत्या उपसा करताना दोन जेसीबीसह एक ट्रक असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल शनिवारी रात्री जप्त करण्यात आला. यात आठ जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस शाखेत नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी केली. यातील दोघांना अटक केली असून सहा आरोपी पसार झाले आहेत.अमित अरविंद हिंगमीरे (रा.अंबापेठ अमरावती),अनिल किसन ढोले (रा.वर्धमनेरी जि. वर्धा), अंकुश रामराव जिरे (रा.आष्टी जिल्हा वर्धा), माणिक चपंत ठाकरे (रा.आष्टी), अनिल मानकर, श्याम नवलाखे, दिलीप अवजारे व एका अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात अंकुश जिरे व माणिक ठाकरे यांना घटनास्थळाहून अटक करण्यात आली असून, ६ आरोपी अद्याप पसार आहेत.नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या रेतीचा उपसा करत असल्याच्या माहितीवरून आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी तेथे धाड टाकली. यात २० लाखांचे दोन जेसीबी व एम एच १२ सी एच ४७४१ क्रमांकाचे ४ लाखांचे ट्रक असा २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध भादंवीच्या कलम ३७९,(३४),११,१५,पर्यावरण संरक्षण कायदा, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी तहसीलदार राम लंके, तिवसा पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
जावरा रेतीघाटात जेसीबीने अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:24 PM
तालुक्यातील जावरा रेतीघाटात आयपीएस अधिकाऱ्यांनी धाड टाकून रेतीचा अवैधरीत्या उपसा करताना दोन जेसीबीसह एक ट्रक असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल शनिवारी रात्री जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देजेसीबीसह ट्रक जप्त : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल