१० जूनला ‘हा’ ग्रह येणार पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:48 PM2019-06-01T12:48:18+5:302019-06-01T12:50:34+5:30
सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह १० जून रोजी अगदी सूर्यासमोर येणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह १० जून रोजी अगदी सूर्यासमोर येणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. गुरू-सूर्य आमने-सामने येण्याच्या कालावधीतील अंतर पृथ्वीपासून सर्वात कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना व जिज्ञासूंना गुरू ग्रहाचे निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील हा काळ साधारणत: १३ महिन्यांचा असतो. यापूर्वी ९ मे २०१८ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती. त्या दिवशी पृथ्वीपासून गुरूचे अंतर ९३ कोटी किमी होते. गुरूचा व्यास १,४२,८०० किमी. आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरुला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता, पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान गॅलिलिओ हे गुरूवर पोहचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.
पृथ्वीपेक्षा गुरू ग्रह ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे एक गुरूचे खास वैशिष्ट्य आहे. 'ग्रेट रेड स्पॉट' या नावाने हा ठिपका ओळखला जातो. त्याची लांबी ४० हजार किमी लांब आणि १४ हजार किमी रुंदीचा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्यात पृथ्वीसारखे तीन ग्रह एका पुढे एक सामावतील. १० जून रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्यांनी पाहता येईल. परंतु, गुरूवरचा ग्रेट रेड स्पॉट व युरोप, गॅनिमिड, आयो व कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत. त्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता भासणार असल्याचे खगोल हौशी अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.