खरीपाची आपदास्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:22 PM2019-07-18T23:22:05+5:302019-07-18T23:24:10+5:30
सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाचे ‘आयसीएआर’द्वारा जिल्हानिहाय पीक आराखडा तयार केला व कृषी विद्यापीठानेही आपत्कालीन पीक नियोजन आरखडा तयार केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने मृदसंधारण व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी बांधबंदिस्ती, सरी व वरंबा पद्धत, संद वरंबा पद्धत, ओलावा टिकविण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यामुळे पिकांचे अवशेष व शेणखत्याच्या सततच्या वापरामुळे शेतजमिनीतील कर्ब वाढून मातीचा कस, जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता व जलधारणक्षमता सुधारण्यास मदत होते. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी पिकामध्ये २१ दिवसांनी कोळपणी करून पिकास मातीची भर द्यावी. पावसाचे ताण असलेल्या पिकावर दोन टक्के युरिया/डीएपीची फवारणी करावी. फळबागांमध्ये आच्छादनासाठी झाडाच्या बुध्यांशी वाळलेले गवत धसकटे किंवा पालापाचोळा आदींचे आच्छादन करावे. फळबागांमध्ये पाण्याचा ताण पडू नये म्हणून केवोलीन ८ टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के या प्रमाणात फवारणी करावी. फळबागांमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी तसेच खोडांना १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या शिफारसीनुसार नियमित मोसमी पाऊस जर दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास त्याला आपत्कालीन परिस्थिती संबोधली जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनात तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्यत बदल करावा लागतो, अन्यथा उत्पादनात कमी येते. पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्यास अशावेळी संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर वाºयाचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी तुषार सिंचन करावे, कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
पावसाळा चार आठवड्यांपेक्षा अधिक उशिरा सुरू झाल्यास (१६ ते २२ जुलै)
पहिल्याप्रमाणेच पिकांचे नियोजन करावे, साधारणपणे १० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा. कपाशीच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. ज्वारीची पेरणी करू नये. पेरल्यास खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी तयारी ठेवावी. मूग व उडदाची पेरणी शक्यतोवर करू नये. केवळ नापेर क्षेत्रावरच करावी व क्षेत्र कमी करावे.
पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा अधिक उशिरा सुरू झाल्यास (२३ ते २९ जुलै)
कपाशीची पेरणी शक्यतोवर करू नये, परंतु काही क्षेत्रावर करावयाची झाल्यास देशी कपाशीचे सरळ, सुधारित वाण वापरावे. बियाण्यांचा २५ ते ३० टक्के अधिक वापर करावा. कपाशीच्या ओळींची संख्या करून एक ते दोन ओळी तुरीच्या पेराव्यात. ज्वारीची पेरणी करू नये. पेरल्यास खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी तयारी ठेवावी. ज्वारीमध्ये ३ ते सहा ओळीनंतर तुरीचे आंतरपीक घेतल्यास जोखिम कमी होते. सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. मूग व उडदाची पेरणी अजिबात करू नये.
पावसाळा २ ते ३ आठवडे उशिरा सुरू झाल्यास (२ ते १५ जुलै)
अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत. साधारणपणे २० टक्के अधिक बियाणे वापरावे, दोन झाडांमधील अंंतर कमी करावे, संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रात आंतरपीक घ्यावे. कापूस : ज्वारी: तूर : ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपिकांचे बियाणे थोडे अधिक प्रमाणात वापरावे. संकरित ज्वारी सीएसएच ९ किंवा सीएसएच १४ वाण वापरावे. सोयाबीनचे टीएएमएस-३८, टीएएमएस ९८-२१ किंवा जेएस ३३५ यापैकी उपलब्ध वाण प्रतिहेक्टरी ७५ ते ८० किलो वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा, किंवा नऊ ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी.