अमरावती : पश्चिम विदर्भात यंदाच्या खरिपासाठी ३२.२८ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यात सर्वाधिक १४,३३,२०० हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचे १४.३३ लाख क्विंटल बियाणे व कपाशीच्या ११,०३,२०० हेक्टरसाठी ५५.१६ पाकिटांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यंदा मान्सून वेळेवर असल्याचे हवामान विभागाने सांगितल्यामुळे खरिपासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागाची लगबग सुरू आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र प्रारंभ होत आहे. त्याच दरम्यान पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. बोंडअळीचे जीवनचक्र खंडित व्हावे, याकरिता बीटी बियाण्यांच्या विक्रीला १ जूनपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीनसाठी १४,३३,२०० हेक्टर, तूर ४,३०,७०० हेक्टर, मूग ८७,५०० हेक्टर, उडीद ६४,२०० हेक्टर, ज्वारी ५४,१०० हेक्टर, मका ४५,१०० हेक्टर, बाजरी ११० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, कपाशी ११,०३,२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केलेले आहे. विभागात एकूण लागवड क्षेत्राच्या ४५ टक्के प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. त्यात गतवर्षीचे सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाल्यामुळे यंदा बियाण्यांची टंचाई राहणार आहे. यंदा सोयाबीनच्या १४.३३ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असताना महाबीजद्वारा ८५,६०७ व राष्ट्रीय बीज निगमद्वारा फक्त १४,००० क्विंटल बियाणे उपलब्ध करणार असल्याने शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करावे लागणार आहे.
बॉक्स
बियाण्यांची सद्यस्थिती
यंदाच्या हंगामात ३२.२८ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. ग्राम बीजोत्पादनाद्वारे १०,६६,२४६ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. सार्वजिनक व खासगी कंपन्यांद्वारे ३,९८,६०७ क्विंटल असे एकूण १४,६४,८५३ क्विंटल बियाणे उपलब्ध होतील. अद्याप ३,८९,९५३ क्विंटल बियाण्यांचा तुटवडा असल्याचे कृषी विभागाने सांगितले. खतांचे ६.०८ लाख मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे, तर युरियाचा १६,२१० मेट्रिक टनाचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.