आठवडाभरात पाच अल्पवयीन मुलींना पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:02+5:302021-01-02T04:11:02+5:30
लीड पान २ अमरावती : अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत त्यांना फूस लावून पळवून नेण्याचे सत्र थांबलेले नाही. सरत्या ...
लीड पान २
अमरावती : अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत त्यांना फूस लावून पळवून नेण्याचे सत्र थांबलेले नाही. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील पाच अल्पवयीन मुलींना लग्न व अन्य बाबींचे प्रलोभन दाखवून पळवून नेल्याच्या तक्रारींची पोलीस ठाण्यात नोंद झाली. गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, फूस लावून पळवून नेलेल्या मुलींचा थांगपत्ता लागलेला नाही.
अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना दरदिवशी उघड होत असताना, त्यांच्यावरील शारीरिक बळजबरीचे प्रकारही थांबलेले नाहीत. धारणी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग झाल्याची गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
वरूड तालुक्यातून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता
वरूड : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलगी २६ डिसेंबर रोजी घरून बेपत्ता झाल्याची तक्रार वरूड पोलिसांत नोंदविण्यात आली. मुलीची आई मजुरीहून परत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. शोधाशोध केल्यानंतर ती दुपारी १ च्या सुमारास पिशवी घेऊन घराच्या बाहेर जाताना दिसल्याचे शेजारी महिलेने सांगितले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. २८ डिसेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. मुलीचे वडील पहाटे कामाला जात असल्याने आई डबा करण्यास उठली तेव्हा १७ वर्षीय मुलगी अंथरुणावर दिसून आली नाही. आजूबाजूला व नातेवाइकांकडे शोध घेतला. मुलीची आई रोहित नेवारे याच्या घरी पोहोचली असता, ती रोहितसोबत गेल्याचे सांगण्यात आले. सबब, आरोपी रोहित दादाराव नेवारे (२२, रा. जरूड) याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार मुलीच्या आईने २८ डिसेंबर रोजी नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
------------------
१३ वर्षीय मुलीला पळविले
चिखलदरा : तालुक्यातील एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. २० डिसेंबर रोजी रात्री ९ नंतर ही घटना उघड झाली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी रात्री आरोपी श्यामदास श्यामराव जामकर (२२, जनुना) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला.
------------------
अल्पवयीन मुलीला फूस
चांदूर रेल्वे : तालुक्यातील एका १६ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, असा संशय व्यक्त करणारी तक्रार २८ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलिसांत दाखल करण्यात आली. २६ डिसेंबर रोजी अपहृत मुलीचे आई-वडील बाहेरगावी असताना, रात्री ९ ते १० च्या सुमारास त्यांची मुलगी घरी नसल्याची माहिती त्यांना मिळाली. यादरम्यान आरोपी हा देखील घरी नसल्याने त्यानेच आपल्या मुलीला पळवून नेले, असा संशय तक्रारीतून व्यक्त करण्यात आला. चांदूर रेल्वे पोलिसांनी संशयित म्हणून विक्कू अशोक चव्हाण (रा. चिरोडी) याच्याविरुद्ध कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
--------------------
ब्राम्हणवाडा परिसरातून मुलीला पळविले
ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. २९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------------
लग्नाचे आमिष, मुलीवर वारंवार अतिप्रसंग
धारणी : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. २६ नोव्हेंबर २०२० पूर्वी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी आरोपी प्रकाश ऊर्फ मनोज जगन काजदेकर (२२, राजपूर, ता. धारणी) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (एन) व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
----------------