देऊतवाडा शिवारातील घटना : दोन महिन्यांपूर्वी फस्त केली जनावरे लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील देऊतवाडा शेतशिवारामध्ये बुधवार २४ मे रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने निद्रिस्त मजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केले. दिवसभर विहिरीचे खोदकाम करून रात्री त्याच ठिकाणी निजलेल्या मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून आसपासच्या लोकांचे बयाण नोंदविले आहे. दीपक वानखडे (रा.सावळापूर, ता. अचलपूर) असे जखमी मजुराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, देऊतवाडा शेतशिवारात सुनील डेहनकर यांचे शेत आहे. याशेतात विहिरीचे बांधकाम सुरु असून याकरिता पाच ते सहा मजूर दिवसभर राबत असतात. दिवसा काम करून रात्रीचा मुक्काम सुद्धा ते शेतातच करतात. बुधवारी रात्री ११.३० च्या दरम्यान दीपक वानखडेसह पाच जण शेतातच झोपी गेले होते. रात्री पाण्याच्या शोधार्थ अडीच ते तीन वर्षांचा बिबट शेतात आला. त्याने दीपक वानखडेच्या डोक्यावर पंजाने प्रहार करून त्याला जखमी केले. सोबतच्या मजुरांनी आरडाओरडा करताच बिबट्याने घटनास्थळारून पळ काढला.घटनेची माहिती गावांत पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून जखमी वानखडेला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनाधिकारी दादाराव काळे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक आशिष चक्रवर्ती, खान तसेच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून तपास केला असता घटनास्थळी आढलळलेले पंजाचे ठसे बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाले. बिबट्याने नदीच्या दिशेने पळ काढल्याचे मजुरांनी सांगितले.दोन महिन्याप्ांूर्वी देखील याच परिसरात बिबट्याने सात ते आठ जनावरांचा फडशा पाडल्याला होता. वारंवार बिबट हल्ले करीत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यानेच मजुरावर हल्ला केला आहे. बिबट पाण्याच्या शोधार्थ शेतात आला असावा. बिबट्याचा परिसरातील वावर लक्षात घेता ग्रामस्थांनी रात्री बेरात्री उघड्यावरील वावर थांबवावा व खबरदारी घ्यावी. - दादाराव काळे,वनाधिकारी, वरूड
बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी
By admin | Published: May 26, 2017 1:39 AM