लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ‘ग्रेटर स्पॉटेड ईगल’ या गरुडवर्गीय पक्ष्याला पक्षिअभ्यासक, छायाचित्रकार प्रशांत निकम आणि संकेत राजूरकर यांनी पोहरा-मालखेड वनपरिक्षेत्रात कॅमेऱ्यात कैद केले. जिल्हा आणि परिसरात यापूर्वी कधीही या पक्ष्याची नोंद झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत निकम व संकेत राजूरकर यांना १३ फेब्रुवारीला पक्षिनिरीक्षण करताना पोहरा-मालखेड वनपरिक्षेत्रात नियमित भटकंतीदरम्यान 'ग्रेटर स्पॉटेड ईगल' अर्थात 'मोठा ठिपकेदार गरुड' या पक्ष्याचे दर्शन झाले. सुमारे ६२ ते ७२ सेमी अर्थात दोन-अडीच फूट लांबी असलेल्या या शिकारी पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांमुळे एकंदर लांबी ही ५.२५ ते ६ फूट एवढी प्रचंड होते. गर्द काळपट तपकिरी डोके आणि पंखांची किनार असणाऱ्या या पक्ष्याच्या शेपटीखाली असलेली इंग्रजी ‘व्ही’ आकारातील पांढरी पिसे ही या पक्ष्याची विशेष ओळख आहे. परंतु, अवयस्क गरुडामध्ये हे वैशिष्ट्य बरेचदा दृष्टीस पडत नाही. शरीर आणि पंखांवरील छोट्या पांढऱ्या ठिपक्यांवरून याला हे नाव प्राप्त झाले आहे.
क्लांगा क्लांगा
‘मोठा चितळा गरुड’ या मराठी नावाने ओळखला जाणार्या या पक्ष्याचे ‘क्लांगा क्लांगा’ हे शास्त्रीय नाव आहे. भारताच्या उत्तर भागात निवास करताना हा गरुड स्थानिक हिवाळी स्थलांतराच्या शेवटच्या टप्यात मध्य व दक्षिण भारतात येतो. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार येथेही तो आढळतो.
दलदलीच्या प्रदेशात आढळ
बेडकासारखे उभयचर आणि जलाशय व दलदलीच्या भागातील सरपटणारे प्राणी हे याचे खाद्य आहेत. त्याकरिताच मोठ्या जलाशयाच्या ठिकाणी, दलदलीच्या प्रदेशात याचा मुख्य आढळ असतो. यासोबतच इतर शिकारी पक्ष्यांचे खाद्य पळवणे, पाणकोंबडीसारखे काही पाणपक्षी हे याच्या खाद्याचा मुख्य स्रोत आहे. एप्रिल ते जून हा या पक्ष्याचा विणीचा हंगाम असून, झाडाच्या टोकावर मध्यभागी खोलगट भागात घरटे वाळलेल्या काटक्या आणि फांद्या यापासून तयार होते.
आकाशात अतिशय उंचीवर उडत असल्यामुळे आणि शिकारी पक्ष्यांच्या सर्वसाधारण समान शरीर वैशिष्ट्यांमुळे गरुडवर्गीय शिकारी पक्ष्यांची ओळख पटवून त्याची नोंद घेणे अवघड काम असते. परंतु, सततचे पक्षिनिरीक्षण अशा महत्त्वाच्या नोंदी होण्यास मदत होते.
- प्रशांत निकम, पक्षिअभ्यासक
केवळ व्याघ्र केंद्रित होऊ पाहणाऱ्या जंगल भ्रमंती ऐवजी आपल्या जवळच्या, आसपासच्या परिसरातील इतर निसर्ग घटक, वन्यजीवन, पक्षिजीवनाबद्दल आकर्षण आणि अभ्यास वाढल्यास पर्यावरणपूरक अशी सकारात्मक आत्मीयता निर्माण होऊ शकते.
- संकेत राजूरकर, पक्षिअभ्यासक
.