तीन एटीएममध्ये लावले स्किमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:23 PM2017-10-22T23:23:59+5:302017-10-22T23:24:15+5:30
एटीएममधून पैसे काढायचे असेल, तर सावधगिरी बाळगा. कारण स्किमरचा वापर करून बँक खात्याची माहिती लीक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एटीएममधून पैसे काढायचे असेल, तर सावधगिरी बाळगा. कारण स्किमरचा वापर करून बँक खात्याची माहिती लीक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. अमरावती शहरातून एटीएम कार्डची माहिती मिळविल्यानंतर त्याचा क्लोन बनविण्यात येतो आणि त्या क्लोनच्या आधारे बनावट एटीमएम कार्ड बनवून खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढली जाते.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शहरातील तीन एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे. सायबर गुन्हेगारांची एक टोळी ही माहिती अन्य शहरात कार्यरत असलेल्या दुसºया टोळीपर्यंत पोहोचवून खात्यातून पैसे काढते. आतापर्यंत घडलेल्या प्रकरणांमध्ये बँक खात्यातील पैसे हरियाणा, आसाम व गुडगाव भागातून काढण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांची एक टोळी अमरावतीत, तर दुसरी टोळी ही वरील नमूद शहरांमध्ये असल्याचा निष्कर्षाप्रत येत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. आतापर्यंत शहरात सहा गुन्ह्यांमध्ये तब्बल सात लाखांपर्यंतची रक्कम बँक खात्यातून काढण्यात आली आहे.
असे लावले जाते स्किमर
एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकले जाते, त्यानजीक स्किमर लावले जाते. एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकताच त्यावरील माहिती स्किमर कॅच करते. पासवर्ड जाणून घेण्यासाठी सायबर गुन्हेगार किपॅडच्या वरील बाजूस छोटा कॅमेरा लावतात. कार्ड व पासवर्डची माहिती मिळताच अन्य शहरात क्लोन कार्ड तयार केले जाते. त्या बनावट एटीएम कार्डद्वारे तेथून पैसे विड्रॉल केले जातात.
सीसीटीव्हीची तपासणी
सायबर गुन्हेगारांनी तास-दोन तासांसाठी स्किमर व कॅमेरे लावून एटीएमवरील व्यवहारांची माहिती चोरल्याचे स्पष्ट होत आहे. या अनुषंगाने सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू असून, एटीएममधील सीसीटीव्हीचा डेटा तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासंदर्भात लवकरच सायबर सेलचे पथक पुणे शहरात जाणार आहे.
शहरातील काही एटिएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याची शक्यता आहे. आतापर्यंत सहा गुन्हे समोर आले असून, एटीएमधारकांनी पैसे काढताना तसे काही आढळळ्यास पोलिसांना कळवावे. याप्रकरणात पोलीस सखोल तपास करीत आहे.
- कान्होपात्रा बन्सा,
पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.