सुभाष दाभिरकर
वरूड (अमरावती) - सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर (म्हणजे ३६६ दिवस) व अधिक महिना असा अद्भूत योग १६५ वर्षांनी जुळून आला आहे. टेंभुरखेडा येथील गणितज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी ही माहिती दिली.
सन २०२० मध्ये शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन मास सुरू होत आहे. हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस आणि ६ तास लागतात. या काळात इंग्रजी कालदर्शिकेनुसार १२ महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास ३५४ दिवसांतच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. हे अंतर तीन वर्षांनी सुमारे १ महिन्याचे होते. सौर मास व चंद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक महिन्याची व क्षय महिन्याची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.
आषाढी एकादशीपासून चतुर्मास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या चतुर्मासाचे विशेष महत्त्व म्हणजे हा काळ यावर्षी ५ महिन्यांचा असेल. कारण अश्विन महिना यावर्षी पुरुषोत्तम म्हणजेच अधिक असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध विधीचा मानला जातो. पितृ पंधरवडा हा पूर्वजांच्या स्मरणाचा काळ मानला जातो. यंदा सर्वपित्री अमावस्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे, हाही मोठा अद्भूत योग आहे.
सन २०२० मध्ये बुधवार, २ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात झाली. गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावशा म्हणजेच सर्वपित्री अमावशेची सांगता होताच दुसऱ्या दिवशी घटस्थापनेस प्रारंभ होते. अधिकमासाला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, संसर्प मास संबोधतात. २६ ऑक्टोबर रोजी विजयादशमी, १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मास समाप्त होईल. चतुर्मास प्रारंभ झाल्यानंतर विवाह, मुंडन, मुंज, कान टोचणे यासारखी शास्त्रानुसार मंगलकार्य टाळली जातात. या चातुर्मासात उपवास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो.